राशीन : गैरकारभारामुळे बंद पडलेल्या श्री पार्श्वनाथ ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या संचालकांच्या जप्त करण्यात आलेल्या स्थावर मिळकतींचा होणारा जाहीर लिलाव रद्द करण्यासाठी वसुलीची ३२ लाख ७६ हजार १७१ रुपयांची रक्कम पतसंस्थेचे अध्यक्ष अविनाश दोशी यांनी जबाबदारी स्वीकारून वैयक्तिकरीत्या कर्जत तहसीलदारांकडे जमा करावी यासाठी या संस्थेच्या निवडक संचालकांनी आपल्या कुटुंबीयांसोबत शुक्रवारी (दि. २७) दोशी यांच्या राहत्या बंगल्याच्या उंबरठ्यावरच ठिय्या देऊन आंदोलन केले.
या आंदोलनात पार्श्वनाथचे उपाध्यक्ष कैलास राऊत, नवीन बोरा, परेश आच्छा, सुधीर संचेती, सतीश मासाळ, प्रकाश दिकेकर, शारदा नष्टे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश होता. पार्श्वनाथच्या संचालकांच्या जप्त केलेल्या स्थावर मिळकतींचा लिलाव करण्याची प्रक्रिया तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी शुक्रवारी (दि. २०) सुरू केली असून ३२ लाख ७६ हजार १७१ रुपयांच्या वसुलीसाठी कानगुडवाडी, करपडी व राशीन परिसरातील दहा मिळकतींचा जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याने या संस्थेच्या संचालकांचे धाबे दणाणले आहे. गैरव्यवहारात आमचा काडीचाही संबंध नसताना मालमत्तेच्या होणाऱ्या लिलावामुळे आमची बदनामी होणार असल्याने संस्थेचे अध्यक्ष दोशी यांनी वसुलीची संपूर्ण रक्कम तहसीलदार यांच्याकडे भरल्याशिवाय आम्ही दारातून उठणार नाही, असा पवित्रा ठिय्या दिलेल्या संचालकांनी घेतल्याने दोशी यांच्या बंगल्यासमोर काही काळ तणावपूर्ण वातावरण तयार झाले होते.
संस्थेचे अध्यक्ष दोशी यांनी भ्रमणध्वनीवरून या संचालकांशी संवाद साधत आपण बाहेरगावी असून संबंधित रकमेचे धनादेश माझी पत्नी सुनीता या देतील, असे सांगितले. त्यानंतर सुनीता दोशी यांनी स्वत:चे वरील रकमेचे तीन धनादेश संचालकांकडे सुपुर्द केल्यावर हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
---------
फोटो ओळी : २७राशीन पतसंस्था
राशीन येथील पार्श्वनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष अविनाश दोशी यांच्या बंगल्याच्या उंबरठ्यावर संचालक व कुटुंबीयांनी ठिय्या दिला.