केडगाव : गेल्या काही महिन्यांपासून नगर बाजार समितीच्या सभापती बदलाच्या मागणीमुळे समितीच्या संचालक मंडळात अंतर्गत कलह सुरू असून आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुतणे संदिप कर्डिले यांनी या कलहाला कंटाळून आज राजीनामा दिला. यामुळे बाजार समितीत सभापती बदलाचे राजकारण चांगलेच तापले आहे.आक्टोबर २०१६ मध्ये नगर बाजार समितीत आमदार कर्डिले, आमदार अरूण जगताप, माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या गटाची एकहाती सत्ता आली. त्यावेळपासून आमदार कर्डिले यांचे विश्वासू विलासराव शिंदे यांच्याकडे सभापतीपदाचा पदभार आहे. त्यानंतर एक वर्षभरातच शिंदे यांना सभापती पदावरून हटविण्यासाठी संचालक मंडळात गटबाजी सुरू झाली. मात्र आमदार कर्डिले यांच्यामुळे हि गटबाजी उफाळून आली नाही. अकरा महिन्यापुर्वीच आमदार कर्डिले यांचे पुतणे संदिप यांना स्विकृत संचालक म्हणून नेमण्यात आले. त्यानंतर त्यांनी बाजार समितीच्या कारभारात जास्त वेळ देऊन लक्ष द्यायला सुरुवात केली. कर्मचारी व इतरांना शिस्त लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले . संदिप यांच्यामुळे सभापती शिंदे यांच्यावर नाराज असलेला गट पुन्हा सक्रिय झाला. संदिप कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सभापती बदलाचे राजकारण तापू लागले. त्यांच्याच नेतृत्वाखाली जवळपास ११ संचालकांनी लेखी मागणी करून सभापती बदलण्याची मागणी केली. काही संचालकांनी यास स्वाक्षरी न करता विरोध केल्याने संचालक मंडळात अंतर्गत कलह सुरू झाला. मागील आठवड्यात संचालक मंडळाची बैठक होती. त्यावेळी एका गटाने सभापती बदलण्याबाबत मोर्चबांधणी केली त्यात संदिप कर्डिले आघाडीवर होते. मात्र नेतेमंडळीनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने संचालक मंडळातील अंतर्गत कलह वाढत गेला.आज संदिप कर्डिले यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा सभापती व सचिवांकडे दिला.‘‘ सभापती बाजार समितीच्या कारभारात लक्ष घालत नाहीत. समितीच्या कामांसाठी वेळ देत नाहीत यामुळे त्यांच्या मनमानी पध्दतीला कंटाळुन मी राजीनामा दिला आहे. बाजार समितीत काम करण्याची माझी इच्छा राहिली नाही’’.- संदिप कर्डिले
नगर बाजार समितीत अंतर्गत कलह : संदिप कर्डिले यांचा संचालक पदाचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 5:35 PM