लोणी : कोरोनापासून बचावासाठी असलेली लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. हीच गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आता मात्र पोलिसांना पाचारण करण्याची वेळ येत आहे. तर दुसरीकडे लसींचा तुटवडा असल्याने प्रशासन हतबल झाले आहे. तथापि, लसीअभावी नागरिकांचीही भटकंती होत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या लसीची परिणामकारकता सिद्ध झाल्याने आणि गेल्या महिनाभरात उलटसुलट तर्कवितर्क लढविले गेल्याने अखेर लसच आपल्याला वाचवू शकते या निष्कर्षाप्रत गेल्यानंतर नागरिकांनी आता लस घेण्यासाठी गर्दी केली आहे. मार्च महिन्यात याच लसीबाबत उलटसुलट चर्चा, तर्कवितर्क लढविले जात होते. लस घेतल्यामुळेच मृत्यू होत असल्याची चर्चा रंगलेली होती. म्हणून लसीकडे सर्वांनी पाठ फिरवली होती. परंतु सर्व्हेअंती दोन्ही लसी या परिणामकारक असल्याचे सिद्ध झाल्याने राहाता तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात व तीन ग्रामीण रुग्णालयात लस घेण्यासाठी गर्दी होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात आठवड्यात सोमवार, बुधवार, शुक्रवार यादिवशी तर ग्रामीण रुग्णालयात दररोज लसीचे डोस दिले जातात.
राहाता तालुक्याला केवळ तीनशे ते चारशे लसीचे डोस उपलब्ध होत असल्याने अनेक नागरिकांना डोस विना घरी परत जावे लागत आहे. प्रथम लस घेणाऱ्यांची गर्दी एवढी प्रचंड असते की, दुसरा डोस घेणाऱ्यांचा त्यात नंबरच लागत नाही. म्हणून लसींचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. अन्यथा ऑक्सिजनमुळे युद्ध होण्याची वेळ आली होती तर यानंतर आता लस घेण्यासाठी युद्ध होण्याची वेळ मात्र येणार नाही अशी व्यवस्था प्रशासनाने करणे गरजेचे आहे.
.............
तालुक्यात ९ ठिकाणी लसीकरण
राहाता तालुक्यात कोल्हार, दाढ, वाकडी, अस्तगांव, सावळी विहिर, डो-हाळे या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात तर राहाता, पुणतांबा, लोणी या तीन सरकारी ग्रामीण रुग्णालय अशा नऊ केंद्रावर लसीकरण केले जात आहे. शुक्रवारी (दि.२३) या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेल्या डोसपेक्षा अधिक गर्दी झाल्याने अनेकांना लसीशिवाय माघारी परतावे लागले.
...........
चारशे ते पाचशे नागरिक रांगेत
लसीचा प्रभाव सिद्ध झाल्यामुळे सध्या राहाता तालुक्यात लस घेण्यासाठी सर्वच केंद्रांवर लांब लांब रांगा लागत आहेत. एवढेच नाही तर आधार कार्ड आणि मोबाईल नंबर देऊन एकेका केंद्रावर जवळपास चारशे ते पाचशे नागरिक लस घेण्यासाठी सकाळपासून गर्दी करीत असतात. .एकेका केंद्रावर केवळ दोनशे ते तीनशे डोस मिळतील एवढ्याच लस उपलब्ध असल्यामुळे अनेक नागरिक संताप व्यक्त करून डोसविना घरी रवाना होतानाचे चित्र सध्यातरी दिसत आहे.
............
सोमवारपासून लसीकरण
अहमदनगर येथून रविवारी (दि.२५) तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि ग्रामीण रुग्णालयात लसपुरवठा करण्यात आलेला आहे. रविवारी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्रत्येकी १६० लसीचे डोस वितरीत करण्यात आल्याने सोमवारी सकाळपासूनच लसीकरणास प्रारंभ होईल.
.......
फोटो - लोणी
कोल्हार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीचा डोस घेण्यासाठी झालेली नागरिकांची गर्दी.