अहमदनगर : राज्य सरकारमधील मंत्री लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाहीत. प्रदेशाध्यक्षांना कार्यकर्त्यांचे प्रश्न ऐकून घ्यायला वेळ नाही. त्यामुळे सरकार आणि पक्षातील शिस्त बिघडली आहे, अशी टीका करीत माजी मंत्री व भाजपाचे नेते बबनराव पाचपुते यांनी भाजपला घरचा आहेर दिला. एकप्रकारे पाचपुते यांनी मनातील खदखदच व्यक्त केली.महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना पाचपुते बोलत होते. रविवारी सावेडीत झालेल्या या मेळाव्यात पाचपुते यांनी स्वपक्षातील बेशिस्तीवरच हल्लाबोल केल्याने कार्यकर्त्यांनीही डोळे विस्फारले.पाचपुते म्हणाले, मंत्रीमंडळातील मंत्री लोकांमध्ये फिरत नाहीत. केंद्रीय मंत्री जिल्ह्यात येतात, मात्र राज्यातील मंत्री कधी जिल्ह्यात फिरकलेले दिसले नाहीत. सामान्य कार्यकर्त्यांना मंत्री भेट देत नाहीत. प्रदेशाध्यक्षही भेटत नाहीत. कार्यकर्त्यांचे ऐकूनही घेत नाहीत. ते नेहमीच संपर्काच्या बाहेर असतात,हे काही पक्षाच्या दृष्टिने चांगले लक्षण नाही. श्रीगोंदा तालुक्यासाठी पाचशे मेगावॅट वीज निर्मितीचे प्रस्ताव तयार करून सरकारडे पाठविले, मात्र त्याला मंजुरी दिली नाही किंवा साधे पत्रानेही उत्तर दिले नाही. मंजुरी मिळाली असती तर गावे विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली असती. त्याचा लाभ निवडणुकीतही झाला असता. मात्र आता तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे राज्यात सरकार असुनही पक्षातील लोकांच्या काय कामाचे? अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली. मी तर आता आमदार होणार आहे. सर्व तयारी करून ठेवली आहे, असे सांगून सरकारच्या भरवशावर नसल्याचेही पाचपुते सांगायला विसरले नाहीत.मेळाव्याची वेळ पक्षाने सकाळी ११ वाजता दिली होती. आपण वेळेवर कार्यक्रमस्थळी आलो. मात्र तब्बल चार तासांनी कार्यक्रम सुरू झाला. त्यामुळे पक्षाची शिस्त गेली कुठे? केवळ कागदं रंगवू नका, तर लोकांपर्यंत पोहचता आले तरच लोक तुम्हाला विचारणार आहेत. सध्या पक्षातील सगळेच हारल्यासारखेच वागत आहेत. मनाने हार मानू नका. गुलाल घेवून फिरायचे की बुक्का घेवून हे तुम्ही ठरवा. संपर्क वाढला पाहिजे. त्यासाठी काम करा. पक्षाने दिलेली शिस्त पाळा, असा सल्लाही पाचपुते यांनी दिला.उत्तरेची संस्कृती दक्षिणेत रोखणार, नगरमध्ये शनिवारी झालेल्या डॉ. सुजय विखे यांच्या कार्यक्रमावरही पाचपुते यांनी टीका केली. विखे यांचे नाव न घेता ते म्हणाले, सध्या दक्षिणेत आरोग्य तपासणी शिबिरे सुरू आहेत. शनिवारी सांस्कृतिक कार्यक्रम झाला. ही जनसेवा असल्याचे ते सांगत आहेत. हा प्रकार म्हणजे ताकाला जावून भांडे लपविणेच आहे. उत्तरेची संस्कृती दक्षिणेत नको आहे. ती संघटितपणे रोखण्यासाठी प्रयत्न करू. वाडिया पार्कवर एवढा मोठा सांस्कृतिक कार्यक्रम झाला तरी खासदार दिलीप गांधी हे काही निराश झाले नाहीत. उलट ते खूश आहेत. कार्यकर्त्यांनीही त्यांच्यासारखाच उत्साह जपला पाहिजे. प्रत्येकाला खासदार व्हायचे आहे. मात्र काम कोणालाच नको आहे. प्रत्येकाने आधी काम केले पाहिजे, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
पक्ष आणि राज्य सरकारमधील शिस्त बिघडली : भाजपनेते बबनराव पाचपुते यांची खदखद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 8:31 PM
राज्य सरकारमधील मंत्री लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाहीत. प्रदेशाध्यक्षांना कार्यकर्त्यांचे प्रश्न ऐकून घ्यायला वेळ नाही. त्यामुळे सरकार आणि पक्षातील शिस्त बिघडली आहे, अशी टीका करीत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी भाजपला घरचा आहेर दिला.
ठळक मुद्देभाजपला घरचा आहेरसरकारमधील मंत्री लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाहीतप्रदेशाध्यक्षही भेटत नाहीतप्रत्येकाला खासदार व्हायचे आहे. मात्र काम कोणालाच नको आहे