अहमदनगर : कोरोनाच्या प्रादुर्भावात एकीकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांसह अधिकारी व कर्मचारी जनतेसाठी २४ तास कर्तव्य निभावत असताना काही हप्तेखोर पोलीस अधिकारी अणि कर्मचाऱ्यांमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत आहे. पोलीस उपअधीक्षकांच्या पथकातीलच तब्बल तीन कर्मचारी लाचलुचपतच्या सापळ्यात अडकल्याने ही हप्तेखोरी सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे.
मागील पाच महिन्यांत जिल्ह्यातील आठ पोलिसांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. यात एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे. तोफखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेतील पोलीस हवालदारास मागील आठवड्यात दारू विक्रेत्याकडून १५ हजार रुपयांचा हप्ता वसूल करताना लाचलुचपत विभागाने जेरबंद केले. ही घटना ताजी असतानाच वाळू वाहतूकदाराकडून हप्त्यापोटी १५ हजार रुपयांची मागणी करणाऱ्या तिघा पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या पथकातील हे तीन कर्मचारी आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल हे स्वतः रस्त्यावर उतरून काम करीत आहेत. अनेक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा बिकट परिस्थितीतही पोलीस दलातील काहीजण निव्वळ वसुलीच्या मागे लागल्याने पोलीस दलाची प्रतिमा डागाळत आहे. अशा हप्तेखोरांवर पोलीस अधीक्षकांनी कडक कारवाई करावी, अशीच मागणी जनतेतून होत आहे.
...........
मागील पाच महिन्यांत हे पोलीस अडकले लाचलुचपतच्या सापळ्यात
पोलीस उपनिरीक्षक सज्जन किसन नार्हेडा, जामखेड पोलीस स्टेशन
पोलीस नाईक बापूराव भास्कर देशमुख, संगमनेर शहर पोलीस स्टेशन
हेड कॉन्स्टेबल शंकर गुलाब रोकडे, पारनेर पोलीस स्टेशन
हवालदार बार्शीकर विलास काळे, तोफखाना पोलीस स्टेशन
पोलीस नाईक सोमनाथ अशोक कुंडारे, नेवासा पोलीस स्टेशन
कॉन्स्टेबल वसंत कान्हू फुलमाळी, कॉन्स्टेबल संदीप वसंत चव्हाण, कॉन्स्टेबल कैलास नारायण पवार
(तिघे नेमणूक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शेवगाव)
.............
तिघे पोलीस कर्मचारी निलंबित
वाळू वाहतूकदाराकडून लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले शेवगाव उपविभागीय कार्यालयातील
तीन पोलीस कर्मचारी वसंत कान्हू फुलमाळी, संदीप वसंत चव्हाण व कैलास नारायण पवार यांच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी केली जाणार असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
..........
तोफखान्याची ‘डीबी’ नेहमीच चर्चेत
चांगले काम करीत नसल्याने पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार तोफखाना पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखा बरखास्त करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी नुकतेच या शाखेचे पुनर्गठन केले होते. या शाखेत नव्याने घेतलेल्या हवालदार बार्शीकर काळे हा लाच घेताना जेरबंद झाल्याने ही शाखा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.