शिर्डी: गुढी पाडव्यानिमित्त साईदरबारी बुधवारी (दि.२५ मार्च) सुर्योदयाला संवत्सर फलाचे वाचन करण्यात आले. यात एप्रिल अखेरपर्यंत रोगराई संपण्याचा दिलासादायक अंदाज वर्तविण्यात आला आहे.साईमंदिराच्या सुवर्ण शिखरावर बुधवारी सुर्योदयाला गुढी उभारण्यात आली. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे व अंजली डोंगरे यांच्या हस्ते गणपती, वरूण यांच्यासह ब्रम्हध्वजाची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली. या विधीचे पौरोहित्य बा. रा. जोशी यांनी केले. यावेळी बोरकर गुरूजी, सुनील तांबे उपस्थित होते.स्वच्छ केलेल्या वेळूच्या काठीवर केशरी रंगाचे नवीन वस्त्र, चांदीचा कलश, लिंबाचा डहाळा इत्यादी बांधून ब्रम्हध्वज शिखराच्या पूर्व बाजूस बांधण्यात आला. त्याची विधीवत पूजा करून लिंबाचा फुलोरा, हिंग, मिरे, गूळ आणि चिंच यांच्या मिश्रणाचा नैवेद्य यावेळी दाखवण्यात आला.सध्या मानव जातीवर आलेले कोरोनाचे संकट लवकर निवारण करून देशाबरोबरच जगभरात सुख, शांती, समृद्धी नांदावी, यासाठी अरूण डोंगरे व अंजली डोंगरे यांनी साईबाबांना साकडे घातले.गुढीपाडव्याच्या निमित्ताने साईबाबांच्या मूर्तीवर सुवर्णालंकार, सुवर्ण मुकूट घालण्यात आला. याशिवाय साखरेच्या गाठी कड्यांचा हारही घालण्यात आला.गुढी पाडव्याला नवीन मराठी वर्ष सुरू होते. यावेळी गुढी पूजनानंतर आगामी वर्षाचे भाकीत वर्तवले जाते. बुधवारी पुरोहित बाळासाहेब जोशी यांनी याबाबत सांगितले की, सध्या सुरू असलेली रोगराई एप्रिलअखेर संपण्याचा संभव आहे. यंदा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मात्र फळे, फळभाज्या व धनधान्य मुबलक होईल. मात्र ते तयार झाल्यावर उंदीर, टोळधाड, आग लागणे अशा नैसर्गिक आपत्तीची शक्यता आहे. यंदा आगीपासून भय असून वणवे पेटतील. जनावरांना रोगराई वाढेल. त्याचा प्रादूर्भाव माणसांना होईल. राजकारणी प्रबळ होतील, असा अंदाज यंदाच्या संवत्सर फलात वर्तविण्यात आला आहे.यंदा भाविकांना मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने सर्व विधी पारंपरिकपणे मात्र भक्तांच्या अनुपस्थितीत एकांतात सुरू आहेत. पाडव्याच्या निमित्ताने शहरातून रात्री काढण्यात येणारी रथ मिरवणूक यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात येणार आहे.
एप्रिल अखेर रोगराई संपेल, यंदा धनधान्यही मुबलक होईल, राजकारणी प्रबळ होतील, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 11:29 AM