अहमदनगर : महापालिकेच्या शहर बस सेवेला केवळ दोनच निविदाधारकांनी प्रतिसाद दिल्याने पुन्हा नव्याने निविदा प्रसिद्ध करण्याची वेळ महापालिकेवर आली. त्यामुळे नवी शहर बस सेवा मिळण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे.जुन्या, नादुरुस्त बसेस सेवेत असल्याने उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी शहर बस सेवेच्या बसेसवर कारवाई करून त्या अटकावल्या होत्या. शिवसेनेच्या सांगण्यावरून ही कारवाई केल्याचा आरोप करीत यशवंत अॅटो या अभिकर्ता संस्थेने शहर बस सेवा चालविण्यास नकार देत सेवा बंद केली. दरम्यान स्थायी समितीच्या आदेशाने महापालिकेने शहर बस सेवेसाठी निविदा प्रक्रिया राबविली. यासाठी तीन संस्थांनी अर्ज घेतले, मात्र प्रत्यक्षात दोघांनीच सादर केले. पहिल्या निविदेसाठी किमान तीन अर्ज आवश्यक होते. दोनच प्राप्त झाल्याने नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे महापालिकेच्या मोटार व्हेईकल विभागाचे प्रमुख परिमल निकम यांनी सांगितले. बीओओ (बिल्ड-ओन-आॅपरेट) या तत्त्वावरील ही निविदा बुधवारी (दि. १८) रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून संस्थांना ४ मेपर्यंत निविदा दाखल करता येणार आहे. १५ ते ३० बसेस चालविण्याबाबत निविदेत उल्लेख आहे.