शेवगाव : शेवगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षा विद्या लांडे यांच्यावरील अविश्वास ठराव मंगळवारी फेटाळण्यात आला. हा ठराव संमत होण्यासाठी १६ नगरसेवकांची आवश्यकता होती. मात्र बैठकीस १४ नगरसेवक उपस्थित राहिल्याने हा ठराव फेटाळण्यात आल्याचे प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी जाहीर केले.शेवगाव नगर परिषदेत एकूण २१ नगरसेवक असून त्या पैकी १५ नगरसेवकांनी एकत्र येऊन ७ जून रोजी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे नगराध्यक्षा लांडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यावर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. १२) नगरसेवकांची विशेष बैठक२ नगर परिषदेच्या कार्यालयात आयोजित केली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्राधिकृत अधिकारी म्हणून प्रांताधिकारी डॉ. बांदल होते. अविश्वास ठराव दाखल करणाºया १५ पैकी राष्ट्रवादीच्या गटातील नगरसेवक विकास फलके बैठकीस अनुपस्थित होते. तर भाजपचे सर्व आठ नगरसेवक, राष्ट्रवादीचे चार व गटनेते सागर फडके यांच्यासह अपक्ष दोन नगरसेवक असे एकूण १४ नगरसेवक बैठकीस हजर होते.दुपारी दोन वाजता बैठक सुरू झाली. त्यात प्रांताधिकारी डॉ. बांदल यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने किती सदस्यांचे मत आहे अशी विचारणा करून त्यांनी हात वर करून मतदान करावे, अशी सूचना केली. त्यावेळी उपस्थित सर्व १४ नगरसेवकांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. मात्र, शेवगाव नगर परिषदेची एकूण सदस्य संख्या २१ असून महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ५५ ( ३) , ५५ ( ४) व ५५ ( ५) नुसार एकूण सदस्य संख्येच्या तीन चतुर्थांश सदस्यांच्या म्हणजे १६ सदस्यांचे अविश्वास ठरावाच्या बाजूने मत असणे आवश्यक होते. परंतु, १४ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले असल्याने हा ठराव फेटाळण्यात येत असल्याचे प्रांताधिकारी डॉ. बांदल यांनी जाहीर केले. या निर्णयाच्या विरोधात कुणाला दाद मागायची असेल तर त्यांना उच्च न्यायालयात दाद मागता येईल , असे ते म्हणाले.निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणारठराव फेटाळला गेल्यानंतर राष्ट्रवादीचे गटनेते सागर फडके, भाजपचे नगरसेवक अरूण मुंडे, अशोक आहुजा व राष्ट्रवादीचे नगरसेवक शब्बीर शेख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तांत्रिक कारणामुळे अविश्वास ठराव फेटाळला असला तरी आम्ही सर्व १४ नगरसेवक एकत्र आहोत. येत्या दोन महिन्यानंतर होणाºया नवीन नगराध्यक्ष निवडीवेळी विजय आमचाच होईल. नगर परिषदेच्या सत्ताधाºयांनी घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केला. तसेच पिठासीन अधिकाºयावरही दबाव आणला. आम्ही याबाबत न्यायालयात दाद मागणार आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.‘त्यांचे’ वैयक्तिक हेवेदावे
शेवगावच्या नगराध्यक्षा म्हणून सर्वांना बरोबर घेऊन काम सुरु आहे. मात्र भाऊबंदकी व एक दोन जणांच्या वैयक्तिक हेव्या-दाव्यापोटी दाखल झालेला अविश्वासाचा प्रस्ताव निरर्थक पद्धतीचा असल्याने त्याला यश आले नाही. एका महिला पदाधिकाºयास जाणून बुजून चुकीच्या पद्धतीने टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी हा प्रस्ताव फेटाळण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली. यापुढील काळात सर्वांना बरोबर घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे नगराध्यक्षा विद्या लांडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले़