रविवारी पारनेर तालुक्यातील वासुंदे येथील मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लूचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यामुळे पशुसंवर्धन विभागाने बाधित भागातील एक किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्यांची विल्हेवाट लावली आहे. ७ हजार २३१ लहान, तर १ हजार ७६३ मोठ्या कोंबड्या व २५० अंडी, तर ३०० किलो पशुखाद्य शास्त्रशुद्ध पद्धतीने जमिनीत पुरण्यात आले. दरम्यान, वासुंदे येथील तुकाराम ठाणगे, शिवाजी पायमोडे, शैला हुलावळे, शांताबाई चेमटे, सनाबाई चेमटे आणि विठबाई चेमटे यांना शासकीय तरतुदीनुसार ३ लाख ७ हजार रुपयांची भरपाई देण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख आणि पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तंबारे यांनी सांगितले.
जिल्ह्यात आतापर्यंत नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील, संगमनेर तालुक्यातील शिंदोडी, पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द आणि वासुंदे या ठिकाणी कोंबड्यांना बर्ड फ्लू संसर्ग झालेला आहे, तर भानगाव (ता. श्रीगोंदा) येथील कावळा बर्ड फ्लूने मरण पावला.
.......................
नवापूरला नगरमधून ३९ पथके रवाना
नाशिक विभागात नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे मोठ्या प्रमाणात बर्ड फ्लूचा संसर्ग झाला असून तेथील तब्बल ९ लाख कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. यासाठी नाशिक विभागातील सर्वच जिल्ह्यातून पशुसंवर्धन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नवापूरला पाचारण करण्यात येत आहे. या कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी मोठे मनुष्यबळ लागणार असल्याने नगर जिल्ह्यातून नवापूरला ३९ पथके रवाना झाले आहेत. प्रत्येक पथकात चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.