पारनेर : जलयुक्त शिवार गाव योजनेत गावे मंजूर झाली, शिवार फेरीत दहा लाख रुपयांची विकासकामेही ठरविण्याचे निश्चित झाले, परंतु पारनेर तालुक्यात शिवार फेरी कागदावरच, गावातील मजुरांना काम उपलब्ध करून देण्यासाठी कामांचे विकास आराखडेच नाहीत, कृषी सहायक, ग्रामसेवकांना आपल्या गावात काय कामे आहेत, याचीच माहिती नाही, यासह विविध कामांचा बोजवारा उडाल्याचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीत उघड झाले. जिल्हाधिकारी कवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, प्रांंताधिकारी संतोष भोर, तहसीलदार भारती सागरे, गटविकास अधिकारी किशोर काळे यांच्या उपस्थितीत पारनेर तालुक्यातील जलयुक्त शिवार गावांमधील योजनांच्या यंत्रणेची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक गावांचा अहवाल घेण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक गावांमध्ये ग्रामसेवक व कृषी सहायकांना आपल्या गावांमध्ये कोणती कामे विकास कामांच्या प्रतीक्षा यादीवर आहेत याचीच माहिती नसल्याचे दिसून आले. तर काहींनी अजूनही कामांचा विकास आराखडाच तयार केला नाही, शिवाय कोणत्याच यंत्रणेचा कोणाशीच समन्वय नसल्याचे दिसून आले. तसेच लघु पाटबंधारे, जिल्हा परिषद, कृषी विभाग, वन विभाग यांच्याकडे अनेक कामांच्या प्रस्तावांना मंजुरीच रखडली असल्याचेही यावेळी निदर्शनास आले. (तालुका प्रतिनिधी)
जलयुक्त शिवार योजनेचा बोजवारा उघड
By admin | Published: March 13, 2016 11:44 PM