अहमदनगर: नागापूर औद्योगिक वसाहतीतील एम व एल ब्लॉकमधील दुर्गंधीयुक्त पाणी बोल्हेगाव परिसरात येत असून, पावसाळ्यात हे पाणी नागरिकांच्या घरात घुसते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी या पाण्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी नगरसेवक ॲड. राजेश कातोरे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.
प्रादेशिक महामंडळाचे उप अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात काताेरे यांनी म्हटले आहे, की नागापूर औद्योगिक वसाहती लगत महापालिका हद्द आहे. या भागात नागरी वसाहत आहे. औद्योगिक वसाहतीतील एम व एल ब्लॉकमधील दुर्गंधीयुक्त पाणी सर्रास नागरी वसाहतीत येते. पावसाळ्यात हे पाणी थेट नागरिकांच्या घरात घुसते. त्यामुळे बोल्हेगाव परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पावसाळा सुरू होण्यास दोन महिन्यांचा अवधी आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतून येणाऱ्या पाण्याचा प्रशासनाने तातडीने बंदोबस्त करावा. जेणे करून पावसाळ्यात या भागातील नागिरकांना त्रास होणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून बोल्हेगाव परिसरात पावसाळ्यात पाणी साचते. रस्त्यांना नाल्यांचे स्वरुप येते, असा आजवरचा अनुभव आहे. पावसाळ्यात गंभीर समस्या निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे प्रशासनाने औद्योगिक वसाहतीतून येणाऱ्या पाण्याची तातडीने विल्हेवाट लावावी, अशी मागणी कातोरे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.