सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा येथील विस्तारित एमआयडीसीतील अंबर कंपनीच्या कामाच्या ठेकेदारीवरून दोन गटात वाद झाला. दोन्ही गटांनी दमदाटी केल्याचा एकमेकांवर आरोप केला आहे. दोन्ही गटांनी सुपा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल केल्या आहेत.
कमल बाबासाहेब गाडीलकर यांनी पहिली फिर्याद दिली आहे. कमल गाडीलकर यांच्या पती व मुलांनी अंबर एंटरप्रायझेस या कंपनीच्या जमीन डेव्हलपमेंटचे काम घेतले आहे. वाघुंडे (ता. पारनेर) येथे शनिवारी (दि. १०) ते काम चालू असताना दुपारी साडेबराच्या सुमारास त्याच कंपनीचे अभियांत्रिकीचे काम घेतलेल्या पुणे येथील सुभाष दहातोंडे, गणेश लामखडे यांनी सोबत आणलेल्या स्थानिक पातळीवरील १० ते १५ जणांच्या टोळक्याने बाचाबाची, मारहाण, शिवीगाळ केली. मद्यप्राशन केलेल्या या टोळक्याने जीवे मारण्याची धमकी दिली, असे गाडीलकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
दुसरी फिर्याद पुणे येथील सुभाष दहातोंडे या बांधकाम व्यावसायिकाने दिली आहे. दहातोंडे यांच्या कंपनीने अंबर एंटरप्रायझेसचे काम घेतले आहे. शनिवारी (दि. १०) दुपारी बाराच्या सुमारास कामाच्या ठिकाणी चर्चा करीत असताना अशोक गाडीलकर, योगेश गाडीलकर, आकाश गाडीलकर, राहुल गाडीलकर, संतोष गाडीलकर व इतर १० ते १५ जणांनी आम्हाला कामाचे कॉन्ट्रॅक्ट द्या नाही तर काम करू नका, असे म्हणत शिवीगाळ केली व धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही गटाच्या फिर्यादी सुपा पोलिसांनी दाखल करून घेतल्या असून पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे व त्यांचे सहकारी पोलीस तपास करीत आहेत.
ठेकेदारीवरून यापूर्वी विस्तारित सुपा एमआयडीसीत हाणामारीपर्यंत प्रकरण गेले होते. भविष्यात एमआयडीसीत कारखानदारी, मोठे उद्योग यायचे असतील तर ही गुंडगिरी थांबली पाहिजे. ठेकेदारीवरून होणारा संघर्ष थांबला नाही तर एमआयडीसी वाढीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल. यात सर्वांचेच नुकसान होईल. एमआयडीसीच्या माध्यमातून रोजगाराची आशा धरून बसलेल्या तरुण युवक व युवतींच्या वाट्याला निराशा येईल हे दुर्लक्षून चालणार नाही. त्यामुळे असे वादळ टाळण्यासाठी पोलिसांना पुढे यावे लागेल.
---
सुपा एमआयडीसीतील अंबर कंपनीच्या कामाच्या ठेकेदारीवरून दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत. त्या दाखल करून घेतल्या आहेत. यातील दोषींविरोधात नक्कीच कारवाई केली जाईल. भविष्यात येथे गुंडगिरी करण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्याच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल.
-नितीनकुमार गोकावे,
पोलीस निरीक्षक, सुपा पोलीस ठाणे