लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : तालुक्यातील १७ सदस्य असलेल्या कोंकमठाण ग्रामपंचायतीमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मतदारांनी कोल्हे गटाची गेल्या ३० वर्षाची सत्ता मोडीत काढली. कोल्हे गटाला फक्त २ जागा शिवसेना ६ व राष्ट्रवादी काँग्रेस ९ अशा बहुमतात १५ जागा देत महाविकास आघाडीच्या हाती सत्ता सोपविली आहे.
तालुक्यातील वाड्या वस्त्यांच्या क्षेत्रफळात विखुरलेली ग्रामपंचायत म्हणून कोकमठाणची ओळख आहे. गेल्या तीस वर्षापासून कोल्हे गटाचे गावातील बाजार समितीचे माजी सभापती संभाजी रक्ताटे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात व माजी सरपंच पोपट पवार यांच्या मार्गदर्शक तत्वानुसारच गावच्या राजकारणाचा गावगाडा चालत होता. पाच वर्षानंतर होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत काळे गट, कोल्हे गट व शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बाळासाहेब जाधव यांच्यात सरळ तिरंगी लढत होत होती. या लढतीत काळे गट व शिवसेना यांच्या कमी जागा निवडून येत तर कोल्हे गटाला याचा थेट फायदा होत बहुमत मिळत होते. त्यानुसार गेली ३० वर्ष या ग्रामपंचातीवर कोल्हे गटाचाच झेंडा राहिला. परंतु, यंदाच्या निवडणुकीत कोल्हे गटाला (भाजप)शह देण्यासाठी राज्यातील महायुतीप्रमाणेच ग्रामपंचायात निवडणुकीत एकत्र येत १७ पैकी राष्ट्रवादीला १० व शिवसेना ७ अशा जागा देण्यात आल्या. तर भाजपाने यांनी सर्वच १७ जागेवर आपले उमेदवार उभे केले. त्यामुळे प्रत्येकवेळी होणारी तिरंगी लढत यंदा दुरंगी करीत कोल्हे गटाची कोंडी करायचे ठरविले. त्यातच गेली अनेक वर्ष सत्तेत राहिल्याने विरोधकांना आपसूकच अनेक कळीचे मुद्दे मिळालेच होते.
कोल्हे गटाच्या पराभवासाठी ठेकेदारी हा मुद्दा कळीचा ठरला. कारण विरोधकांनी प्रत्येक मतदारापर्यंत हा संदेश जाईल याची चोख व्यवस्थाच केली होती. कारण, कोल्हे गटाच्या वरील प्रमुख नेत्यांनी ग्रामपंचायतीमध्ये आपल्याच नात्यागोत्यातील ठेकेदारांना ग्रामपंचायत अंतर्गत विविध कामे मिळवून दिली. त्यातून झालेल्या कामाचा दर्जा राखण्यातही सत्ताधारी अपयशी ठरले, एक न अनेक मुद्दे घेउन महाविकास आघाडी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदारांसमोर गेली. आणि मतदारांना यंदा गावात बदल करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला मतदारांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यामुळे गेल्या ३० वर्षात गावात अनेक विकास कामे करूनही मतदारांनी कोल्हे गटाची सत्ता मोडीत काढून महाविकास आघाडीच्या हाती सत्ता दिली. विशेष म्हणजे या सत्ता परिवर्तनासाठी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बाळासाहेब जाधव व राष्ट्रवादीचे साहेबराव रोहम यांच्या गटाची भूमिका गेम चेंजर ठरली.
............
माजी सरपंचांचा पराभव ..
बाजार समितीचे माजी सभापती संभाजी रक्ताटे यांचे बंधू असलेले माजी सरपंच सोपानराव रक्ताटे तसेच माजी सरपंच अलका लोंढे यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. विशेष म्हणजे हे दोघेही कोल्हे गटाकडून सरपंच राहिलेले आहे.