अहमदनगर : फ्रन्टलाइन वर्कर, ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना सध्या कोरोना लसीकरण सुरू आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षांपुढील सर्वांनाच लस देण्यात येणार आहे. त्यामुळे मागणी वाढून लसीकरणात खोडा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सद्य:स्थितीतच मागणीएवढा पुरवठा होण्यात काही अडचणी येत आहेत.
नगर जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, महसूल, पोलीस तसेच फ्रन्टलाइन वर्करला लस देण्यात आली. त्यानंतर पुढील टप्पा म्हणून १ मार्चपासून ६० वर्षांपुढील नागरिक तसेच सहव्याधी असलेले ४५ वर्षांपुढील नागरिक यांचा समावेश करण्यात आला.
नगर जिल्ह्यात सध्या १०७ लसीकरण केंद्रांवर लस देण्यात येत असून, काही केंद्रांवर लसीचा तुटवडा भासत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात फ्रन्टलाइन वर्कर, तसेच ज्येष्ठ नागरिक मिळून १ लाख ७१ हजार जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. नगर जिल्ह्याची सद्य:स्थितीतील लोकसंख्या सुमारे ५० लाख आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार ६० वर्षांवरील नागरिक तसेच सहव्याधी असलेले ४५ वर्षांपुढील नागरिक सुमारे १५ टक्के म्हणजे साडेसात लाख आहेत. आता सरसकट ४५ वर्षांपुढे म्हटले तर ही संख्या २५ टक्क्यांपर्यंत जाते. म्हणजे १ एप्रिलपासून जिल्ह्यात सुमारे साडेबारा लाख लोकांना लसीकरणाची आवश्यकता भासणार आहे. तेवढ्या लसीचा पुरवठा जिल्ह्याला मिळणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु मागणी वाढून लसीचा पुरवठा न झाल्यास लसीकरण मोहीम अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
----------
जिल्ह्यातील आतापर्यंत लसीकरण आढावा
विभाग. पहिला डोस दुसरा डोस
आरोग्य विभाग. २५४०४. १४५६४
महसूल. १२१२. ४९२
पोलीस. ३१०२. १०५८
इतर. ४८९६. १५१४
ज्येष्ठ नागरिक. ११५३१७. ४०६४
-------------
एकूण. १४९९३१. २१६९२
-----------------
पाच लाख नागरिक वाढणार
१ एप्रिलपासून ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यात असे नागरिक सुमारे पाच लाख आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरण केंद्र वाढविण्याचे नियोजन सुरू आहे.
---------------
सध्या मागणीएवढा लसीचा पुरवठा होत आहे, परंतु पुढे आणखी मागणी वाढल्यास आरोग्य केंद्रांची संख्या वाढविण्यात येईल. त्यामुळे उपकेंद्र स्तरावरही लसीकरण सुरू केले जाईल.
- डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी