अहमदनगर : शहर व तालुक्यातील शंभर रुग्णांच्या मागे फक्त १७ रेमडेसिविर इंजेक्शन मिळत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाला असून, रुग्णांच्या नातेवाईकांची शोधाशोध सुरू झाली आहे. रेमडेसिविरचा कोटा कमी मिळत असल्याने खासगी डॉक्टरांकडून पुन्हा एकदा रुग्णांच्या नातेवाईकांना चिठ्ठ्या लिहून दिल्या जात आहेत.
जिल्ह्यामध्ये सध्या २७ हजार कोरोनाचे रुग्ण सक्रिय आहेत. त्यामध्ये पाच ते सात हजार रुग्ण विविध खासगी रुग्णालयात दाखल असून, त्यांना रेमडेसिविरची आवश्यकता आहे. मात्र, दिवसाला दीड हजारपेक्षा जास्त इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना पुन्हा एकदा धावपळ करावी लागत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी रेमडेसिविरचा कोटा निश्चित करण्याचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार संबंधित प्रांताधिकारी हे त्या त्या तालुक्यातील कोटा निश्चित करीत आहेत. प्राप्त रेमडेसिविर, गंभीर रुग्णांची संख्या यानुसार प्रांताधिकारी कोटा निश्चित करतात. मात्र, खासगी डॉक्टरांकडून मागणीपेक्षा कमीच पुरवठा असल्याने डॉक्टरांनाही नाईलाजाने चिट्ठी लिहून द्यावी लागत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रुग्णांच्या नातेवाईकांची इंजेक्शनसाठी धावाधाव सुरू आहे. त्यात नगर शहरातील खासगी रुग्णालयांमध्येच सर्वाधिक रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील निम्म्या रुग्णांना जरी रेमडेसिविर लागली तरी १६०० रेमडेसिविर एकट्या नगर शहरात लागतात. मात्र, दीड हजार रेमडेसिविर जिल्ह्यासाठी येत आहेत. त्यामुळे डॉक्टरांचाही नाईलाज झाला आहे.
-----------
नगर शहरातील स्थिती
एकूण रुग्णालये-८२
रुग्णालयातील एकूण बेड-३२४८
८ मे रोजी मिळालेले रेमडेसिविर-५६७
बेडवरील रुग्णांशी इंजेक्शनचे प्रमाण-१७ टक्के
९ मे रोजी मिळेलेले रेमडेसिविर-३४८
बेडवरील रुग्णांशी इंजेक्शनचे प्रमाण-१० टक्के
-----------------
इंजेक्शन बीडने पळविल्याची चर्चा
नगर शहरातील काही औषध विक्रेते पुणे येथील एका कंपनीकडे गेले होते. त्यांनी रेमडेसिविरचा कोटा कमी मिळत असल्याची तक्रार केली. मात्र, त्या कंपनीला बीड जिल्ह्यातील एका मंत्र्यांचा फोन आला आणि नगरचा कोटा अचानक कमी झाला, असे केमिस्ट असोसिएशनचे काही पदाधिकारी खासगीत सांगतात. याबाबत नगर जिल्ह्यातील मंत्री काहीच प्रयत्न करीत नाहीत, याकडे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे ‘लोकमत’ने लक्ष वेधले असता ते म्हणाले, आम्हीही प्रयत्न करीत आहोत. मात्र, संबंधित कंपन्यांच्या मालकांनी त्यांचे फोन बंद करून ठेवले आहेत. उत्पादन वाढविण्याबाबत आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, असे त्यांनी सांगितले.
----------
खासगी रुग्णालयांना वाटप करण्यात आलेले इंजेक्शन संबंधित रुग्णालयांनी तीन दिवसांच्या आत संबंधित एजन्सीकडून प्राप्त करून घ्यायचे आहेत. तीन दिवसात इंजेक्शन घेतले नाहीत, तर ते इतर रुग्णालयांना वाटप केले जातील. त्यामुळे वाटप होताच कोट्याप्रमाणे रुग्णालयांनी इंजेक्शन ताब्यात घ्यावीत. डॉक्टर शिफारस करतील, त्याच रुग्णांसाठी इंजेक्शन मिळेल. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांशीच संपर्क साधणे आवश्यक आहे.
- श्रीनिवास अर्जुन, प्रांताधिकारी, अहमदनगर