केडगाव : सोशल मीडियाच्या काळातही माणसा-माणसांना त्यांच्या सुख-दु:खाचे ‘निरोप’ घर पोहोच करणाऱ्या पोस्टमन काकांचे कोरोनाच्या संकटातही घरोघरी जाऊन टपाल पोहोच करण्याचे काम अविरत सुरू आहे. लॉकडाऊनच्या तीन महिन्यांच्या काळातच केडगावमध्ये ३० हजार टपालांचे वितरण पोस्टमन काकांनी जीव धोक्यात घालून केले.
माणसांना त्यांच्या जवळच्या माणसांचे निरोप पोहोच करण्यासाठी स्वत:च्या पायाच्या टाचा झिजविणाऱ्या पोस्टमन काकांचे काम कोरोनाच्या संकटातही सुरू आहे. डाक विभागाच्या सेवा अत्यावश्यक सेवेमध्ये आहेत. सुरुवातीपासून डाक विभागातील कर्मचारी नियमित सेवा ग्राहकांना देत आहेत. ते काेरोना काळात घरोघरी जात कर्तव्य बजावत आहेत. हे करत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तरीही या राष्ट्रीय आपत्तीमध्ये पोस्टमन बांधव हे अडचणीवर मात करत आपले कर्तव्य पार पाडत आहेत. पोस्टमन बांधव हे ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगत सेवा देत असतात. केडगाव पोस्ट ऑफिसमध्ये सहा पोस्टमन, एक पोस्टमास्तर, एक शिपाई, दोन क्लार्क असे दहा कर्मचारी आहेत. मार्च महिन्यापासून आतापर्यंत केडगावमध्ये ३० हजार टपालांचे वाटप केले.
---
लसीकरणामध्ये डाक कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष
कोविड काळातही डाक विभागातील सर्व सेवा सुरळीतपणे चालू आहेत, परंतु शासनाने फ्रंटलाईन वर्करमध्ये डाक विभागाचा समावेश न केल्याने कर्मचाऱ्यांना लसीकरणामध्ये प्राधान्य मिळत नाही. त्यामुळे लसीकरण करून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना मोठ्या त्रासास सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अजूनही मोठ्या संख्येने डाक कर्मचारी लसीकरणापासून वंचित आहेत. कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर समजून त्यांना लसीकरणात प्राधान्य देण्यात यावे, अशी आग्रही मागणी नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईजचे नेते संतोष यादव यांनी पालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे.
----
कोरोना काळात असे चालते कामकाज
तोंडाला मास्क घालून भल्या सकाळी पोस्ट ऑफिसमध्ये आलेला पोस्टमन प्रथम सॅनिटायझर लावतात. मग पोस्टात आलेल्या टपालांची क्रमवारी करण्यासाठी बीटनिहाय त्यांचे वेगवेगळे गट तयार करतात. त्यानंतर संगणकीय नोंदणी करून बीट डिलेव्हरी करण्यासाठी सज्ज होतात. सध्या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पोस्टाकडून विंडो डिलेव्हरी सेवा सुरू आहे. आपल्या पिशवीत सॅनिटायझर टाकून पोस्टमन घरोघरी जाऊन टपाल वाटतात. हे करीत असताना सुरक्षित अंतराचे नियमही पाळतात.
---
प्रशासनाचे कोविडबाबतचे सर्व नियम पाळत आम्ही आमच्या अनमोल ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतो. या राष्ट्रीय आपत्तीमध्ये ग्राहकांना जास्तीत जास्त सेवा देण्यात पोस्ट ऑफिस मोलाची भूमिका बजावत आहे. याचा आम्हाला कर्मचारी या नात्याने अभिमान आहे.
-संतोष यादव,
सबपोस्टमास्तर, केडगाव
190521\img-20210519-wa0084.jpg~190521\img-20210519-wa0083.jpg~190521\img-20210519-wa0091.jpg
कोरोनाच्या संकटातही पोस्टमन काकांचे कामकाज स्वताचा जीव धोक्यात घालुन सुरू आहे .~पोस्टमन~पोस्टमन