निंबळक : नगर तालुक्यातील खारेकर्जुने येथे कृषी विभागाच्या वतीने एक गाव-एक वाण मोहिमेंतर्गत अजित-१५५ कापसाच्या बियाण्यांचे प्रताप शेळके यांच्या हस्ते गुरुवारी वितरण करण्यात आले.
शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती व उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढायचे असेल तर त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. एक गाव-एक वाण या मोहिमेच्या माध्यमातून निश्चितच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, असा विश्वास जि. प. उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विलास नलगे, पं. स.चे उपसभापती डॉ. दिलीप पवार, उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, सरपंच प्रभाकर मगर, उपसरपंच अंकुश शेळके, मंडल कृषी अधिकारी सूर्यकांत शेकडे, कृषी पर्यवेक्षक विजय सोमवंशी, अजित सीडसचे दीपक काशीद, जनार्दन निमसे, शिवाजी शेळके, बबन शेळके, राजू सय्यद, संभाजी पानसंबळ, यशवंत गाडेकर, अभिजित डुक्रे, सुविधा गिरी, कीटकर, आदी उपस्थित होते.
या मोहिमेंतर्गत गावातील शेतकऱ्यांची बैठक होऊन त्यात अजित-१५५ वाणाची सर्वानुमते निवड करण्यात आली. एक वाण वापरल्यामुळे पेरणी कशी करावी, औषध कोणते फवारावे व कसे वापरावे याची माहिती मिळेल. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. विलास नलगे म्हणाले, कापूस पिकाची उत्पादकता वाढण्यासाठी शासनाच्या माध्यमातून एक गाव-एक वाण मोहिमेंतर्गत खारेकर्जुने येथे ६६ शेतकऱ्यांना अजित-१५५ या कापूस बियाण्यांचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन विजय सोमवंशी यांनी केले. उपसरपंच अंकुश शेळके यांनी आभार मानले.
----
१० खारेकर्जुने
कृषी विभागाच्या एक गाव-एक वाण मोहिमेंतर्गत खारेकर्जुने येथे कापूस बियाण्यांचे वितरण करण्यात आले.