धामणगाव आवारी : धामणगाव आवारी जिल्हा परिषद शाळेतील पदवीधर शिक्षिका रोहिणी खतोडे यांनी शनिवारी शाळेतील तब्बल दीडशे विद्यार्थ्यांना स्वखर्चातून मास्कचे वाटप करत कोरोना जागृतीचा संदेश दिला. सरपंच पूनम आवारी यांच्या हस्ते या मास्कचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
यावेळी उपसरपंच गणेश पापळ, ग्रामपंचायत सदस्य पोपटराव देशमुख, मुख्याध्यापक भाऊसाहेब इरनक, मधुकर नवले आदी उपस्थित होते. कोरोनाच्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम साध्या पद्धतीने घेण्यात आला.
विद्यार्थ्यांनी आपले हात नियमित स्वच्छ ठेवावे, सॅनिटाईझ करावे, मास्क लावण्याबरोबर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आदी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे आणि आपल्या घरीही हा संदेश द्यावा, असे आवाहन यावेळी सरपंच पूनम आवारी यांनी केले.
शिक्षिका रोहिणी खतोडे यांनी स्वखर्चातून विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप केल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष केशव पापळ, उपाध्यक्ष देवदत्त नवले यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक भाऊसाहेब इरनक यांनी केले. स्वागत दत्तात्रय लांडगे यांनी केले. सूत्रसंचालन बाळू खाडे यांनी केले तर स्वाती अडाणे यांनी आभार मानले. यावेळी विक्रम गायकर, बाळासाहेब तोरमड, भारती काळे, सुनीता आंबरे आदी शिक्षक उपस्थित होते.