चंद्रकांत शेळके ।
अहमदनगर : कोरोनामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा मार्चमध्येच बंद झाल्याने शाळेत पोषण आहार शिजला नाही. परिणामी एप्रिल-मे मध्ये शिक्षकांनी हा पोषण आहार जिल्ह्यातील ४ लाख ४० हजार ५११ विद्यार्थ्यांना वाटप केला. यात १९ हजार ३६९ क्विंटल तांदूळ, तर ४ हजार ८३३ क्विंटल डाळी- कडधान्याचा समावेश आहे.
शासनाकडून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना पोषण आहार दिला जातो. कोरोनामुळे जिल्ह्यातील सर्वच शाळा मार्चमध्येच बंद करण्यात आल्या. त्यामुळे पोषण आहार विद्यार्थ्यांना वाटप करण्याच्या सूचना दिल्या. कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन शिक्षकांनी या पोषण आहाराचे वाटप पालकांना शाळेत बोलावून केले. एप्रिल महिन्यामध्ये शिक्षकांनी पोषण आहाराचे बरेचसे वाटप केले. काही ठिकाणी पोषण आहार मे मध्ये वाटप करण्यात आला. दरम्यान जिल्ह्यात सर्वाधिक पोषण आहार संगमनेर व शेवगाव तालुक्यात वाटप करण्यात आला, तर सर्वात कमी पोषण आहार जामखेडमध्ये वाटप झाला.पोषण आहारमध्ये प्रमुख्याने तांदूळ व डाळी-कडधान्य (मूग,तूर, मटकी) याचे वाटप करण्यात आले.
मसाले वाटप नाही पोषण आहार वाटप करताना शिक्षकांनी तांदूळ डाळी व कडधान्याचे वाटप केले आहे़ पॅकिंग वस्तू जसे मसाले, मीठ, तेल याचे वाटप केलेले नाही. या वस्तू आणखी काही दिवस टिकणार असून पुन्हा वापरात येतील, असा शिक्षण विभागाचा कयास आहे.
फेब्रुवारी, मार्चपर्यंत पोषण आहार शाळांकडे आलेला होता. १७ मार्चपर्यंत पोषण आहार शाळेमध्ये वाटला. त्यानंतर शाळा बंद झाल्या. त्यामुळे उरलेला पोषण आहार एप्रिलमध्ये वाटप करण्यात आला. तेव्हापासून नवीन पोषण आहार शासनाकडून मिळालेला नाही़ - रमाकांत काठमोरे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग