अहमदनगर : ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा पुरवठा समन्यायी पद्धतीने करण्यात येईल. तसेच सरकारी व खासगी असा भेद न करता ऑक्सिजनचे वाटप होईल. याबाबत जिल्हाधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाच्या वरिष्ठांशी चर्चा केली आहे. कोरोनाला रोखण्याच्या कामात खासगी रुग्णालयांना प्रशासन सर्व सहकार्य करील, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
पालकमंत्री मुश्रीफ यांनी शनिवारी कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर राज्य आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी नगर शहरातील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी आ. रोहित पवार, आ. किरण लहामटे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, माजी आ. डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. सतीश सोनवणे, डॉ. प्रशांत पटारे, डॉ. सागर झावरे आदी उपस्थित होते.
यावेळी पोपटराव पवार म्हणाले, जिल्ह्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. रेमडेसिविरही मिळत नाहीत. जिल्ह्यातील लोकसंख्या आणि रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत रेमडेसिविरही मिळत नाहीत. तसेच ऑक्सिजनचे वाटप करताना सरकारी आणि खासगी दवाखाने असा भेद असू नये. बीड जिल्ह्यातील रुग्णही नगरला दाखल असतात. अशा वेळी नगरचा रेमडेसिविर व ऑक्सिजनचा कोटा वाढवून देणे गरजेचे आहे. सातत्याने रुग्णसंख्या वाढत आहेत. त्याचा आधार घेऊन या दोन्हींचा पुरवठा करणे गरजेचे आहे.
पवार यांच्या सूचनांची पालकमंत्र्यांनी दखल घेत त्वरित अन्न व औषध प्रशासन, तसेच आरोग्य विभागाच्या नाशिक, पुणे येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. तसेच उपलब्ध झालेला ऑक्सिजन व रेमडेसिविरचा पुरवठा योग्य व समन्यायी प्रमाणात व्हावा, याविषयी जिल्हाधिकारी भोसले यांना सूचना दिल्या. सर्वांना समप्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होईल. तसेच रेमडेसिविरचा कोटाही लवकरच वाढवून मिळेल. याबाबत सर्वांशी चर्चा झाली आहे. जिल्हाधिकारी त्याचा पाठपुरावा करतील, असे मुश्रीफ यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले.
---------
फोटो - ०२डॉक्टर मीट
नगरमधील डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने शनिवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. समवेत पोपटराव पवार, आ. रोहित पवार, डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. सतीश सोनवणे, डॉ. प्रशांत पटारे, डॉ. सागर झावरे आदी उपस्थित होते.