अहमदनगर : नगर महापालिका क्षेत्रातील १५ आणि ग्रामीण भागात २३ अशा जिल्ह्यात एकूण ३८ शिवभोजन थाळी केंद्रावर पाच महिन्यात ७ लाख ५१ हजार ६०० थाळ्यांचे वाटप केल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली.
ब्रेक द चेन च्या प्रक्रियेंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर गरीब व गरजू लोकांचे जेवणाअभावी हाल होऊ नये, यासाठी १५ एप्रिल २०२१ पासून शिवथाळी नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच जिल्ह्याच्या इष्टांकात दीड पट वाढ करण्यात आली होती. जिल्ह्याला दैनंदिन ६९०० थाळ्यांचा इष्टांक होता. तेवढ्या थाळ्या रोज वितरित करण्यात येत आहेत. १५ एप्रिल २०२१ ते २६ ऑगस्ट २०२१ या कालावधीत जिल्ह्याच्या शिवभोजन केंद्राद्वारे ७ लाख ५१ हजार ६०० थाळ्या वाटप करण्यात आल्या होत्या, असे माळी यांनी सांगितले. सध्याही या थाळ्या नि:शुल्क वितरित करण्यात येत असल्याचे माळी यांनी सांगितले.