जिल्हाधिकारी डॉ. भोसले : श्रीरामपुरात विजय सप्तपदी अभियानास प्रारंभ
अहमदनगर : जिल्ह्यात ८६८ रस्ते, ३१६ पाणंद रस्ते, पाच हजार ७३० जमीन तुकडे तोडणी भंग प्रकरणे, जागेअभावी सात हजार ६७० बेघर, ३५० गावांत भूसंपादन कार्य प्रलंबित असून, विजय सप्तपदी अभियानातून जिल्हा प्रशासन ते प्राधान्याने सोडविणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाच्या संकल्पनेतून येथील उत्सव मंगल कार्यालयात रविवारी सप्तपदी अभियानास उत्साहात प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी डाॅ. भोसले बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर जिल्हाधिकारी पिराजी सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप नचित, अपर पोलीस अधीक्षक डाॅ. दीपाली काळे, प्रांताधिकारी दयानंद जगताप, गोविंद शिंदे, देवदत्त केकाण, पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, उपनगराध्यक्ष करण ससाणे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डाॅ. भोसले म्हणाले, महसूल प्रशासनात कार्यरत असताना ५० कायद्यांची सुधारणा झाली. परंतु, सुधारित कायद्यांची अंमलबजावणी झाली नाही तर काही उपयोग होणार नाही. कायदे कागदावरच राहतात. प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे महसूल विजय सप्तपदी अभियानाद्वारे सात विभागांतील अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत.
प्रशासनाने समोचाराने विविध प्रश्न सोडविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे सर्वांनी अभियानात सहभागी होऊन प्रश्नांची सोडवणूक करावी. केवळ महसूल प्रशासनाचे प्रश्न म्हणून चालणार नाहीत, तर सर्वांना मिळून काम करावे लागेल. कायदे केवळ पुस्तकात राहून उपयोग होत नाही. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष वादाच्या रस्त्यावर जाऊन अडथळा दूर करावा. आपण स्वत: शेतकरी कुटुंबातील असून, अधिकारी झाल्यानंतर स्वतःच्या शेत रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षे सोडविता आला नाही. मुलगा महसूलमध्ये अधिकारी असल्याने रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा वडिलांनी व्यक्त केली. परंतु, कार्यालयातील सहकारी संपत यांच्याशी वाद असल्याने अखेर सामोपचार करून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला.
याप्रसंगी आमदार लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांची भाषणे झाली. प्रांताधिकारी अनिल पवार यांनी प्रास्ताविक केले. तहसीलदार प्रशांत पाटील यांनी आभार मानले. तहसीलदार स्वाती देवरे यांनी अभियान गीत सादर केले.