अहमदनगर : जिल्ह्यातील बळीराजा दुष्काळाने होरपळत असताना जिल्हा बँकेतील संचालक मंडळाला मात्र युरोप वारीचे डोहाळे लागले आहेत. अभ्यास दौरा, या गोंडस नावाखाली ही सहल आयोजित करण्यात आली असून, पुढील आठवड्यात संचालक मंडळ मौजमजा करण्यासाठी युरोप दौ-यावर जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राज्यातील दुष्काळी जिल्ह्यांच्या दौ-यावर आहेत. सततच्या दुष्काळाने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना ते बांधावर जाऊन धीर देण्याचे काम करत आहेत़ जिल्हा सहकारी बँकेत याच पक्षाची सत्ता आहे़ जिल्हा बँकेची शेतक-यांशी पिढ्यान पिढ्यांची बांधिलकी आहे़ ज्यावेळी शेतकरी अडचणीत येतो, त्या त्यावेळी त्यांच्या मदतीला बँक धावून जाते, असे शेतकरी आणि बँकेतील हे अतूट असे नाते आहे़ पक्षाच्या नेत्यांची नाळ शेतक-यांशी जुळलेली आहे़ मात्र पक्षाच्या नेत्यांची ही भूमिका त्यांच्याच पक्षाच्या संचालक मंडळाकडून पायदळी तुडविली जात असल्याने सर्वसामान्य शेतक-यांतून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे़शेतक-यांचे जीवनमान सुधारावे, यासाठी संचालक मंडळाने विदेशात जाऊन अभ्यास करावा, असा शिरस्ता आहे़ गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे़ परंतु, सध्याचा काळ वेगळा आहे़ शेतकरी दुष्काळाने होरपळला आहे़ पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली़ पण, शेतीची मशागत कुठून आणि कशी करायची, असा शेतक-यांसमोरचा पहिला प्रश्न आहे़खरिपाची पिके उभी करण्यासाठी खिशात खडकूदेखील नाही, अशी शेतक-यांची स्थिती आहे़ पण, याच शेतक-यांच्या घामाच्या पैशावर हे संचालक मंडळ विदेशात मौजमजाच करणार आहे़ त्यापलीकडे काहीही होणार नाही़ यापूर्वीच्या अभ्यास दौ-यांत संचालक मंडळांनी काय दिवे लावले़ त्यांच्या या अभ्यास दौ-यांमुळे बँकेचे आणि पर्यायाने शेतक-यांच्या जीवनमानात काय सुधारणा झाल्या, याचा अभ्यास करण्याची वेळ आता शेतकरी सभासदांवर आली आहे़जिल्हा बँकेचे २१ जणांचे संचालक मंडळ आहे़ संचालक मंडळाच्या युरोप अभ्यास दौ-यासाठी बँकेने निविदा मागविल्या होत्या़ दोन निविदा प्राप्त झाल्या असून, त्यांच्याशी वाटाघाटी सुरू आहे़ ही प्रक्रिया पूर्ण होऊन पुढील आठवड्यात दौ-याची तारीख निश्चित केली जाईल़.-रावसाहेब वर्पे, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा सहकारी बँक.
जिल्हा बँकेचे संचालक मंडळ युरोप दौ-यावर : पदाधिका-यांना सुकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:09 PM