अहमदनगर : जिल्हा परिषदेत अधिका-यांनी मनमानीपणे बदल्या केल्या. पदाधिका-यांची एकही तक्रार विचारात घेतली नाही. देशसेवा करणा-या अपंग माजी सैनिकाच्या बदलीची विनंतीदेखील मुख्य कार्यकारी अधिका-यांनी मान्य केली नाही. अधिकारी हे जिल्हा परिषदेपेक्षा सर्वोच्च झाल्याने या सभागृहातच बसण्याचा आम्हाला अधिकार नाही, असा संताप व्यक्त करत अध्यक्षा शालिनी विखे यांच्यासह पदाधिकारी व सर्व सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या सभेतून आज सभात्याग केला. नगर जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच असा प्रकार घडला आहे. नगर जिल्हा परिषदेमध्ये नुकतीच बदल्याची प्रक्रिया पार पडली. प्रशासनाने राबविलेल्या या प्रकियेतबाबत कर्मचारी संघटनांसह सर्व पदाधिकारी व सदस्य नाराज होते. या सर्वांनी वेळोवेळी सीईओंकडे तक्रारी केल्या. मात्र याबाबत त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे आजच्या सर्वसाधारण सभेत बदल्यांतील अनियमितेबाबत पदाधिकारी व सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. बदल्यांमध्ये प्रशासनाने मोठ्या प्रमाणात अनियमितताी केली आहे. काही अधिका-यांच्या नातेवाईकांच्या बदल्यांमध्ये सोय होते. इतर कर्मचा-यांची मात्र गैरसोय केली जाते. हा कुठला प्रकार आहे. तुम्ही इतकी मनमानी केली आहे. तुम्ही एका अपंग माजी सैनिकाची विनंतीदेखील विचारात घ्यायला तयार नाही, अशी नाराजी अध्यक्षा विखे यांनी नोंदवली. आम्ही सर्व सभागृहाच्या वतीने तुम्हाला या माजी सैनिकाची विनंती विचारात घेण्याचे आवाहन करत आहोत. देशसेवेसाठी एवढी बदली तरी करा अशी विनंती सभागृहाच्या वतीने माने यांना केली. मात्र तरीही त्यांनी आपला हेका सोडला नाही. त्यामुळे अध्यक्षांसह सर्व सदस्यांनी तात्काळ बहिष्कार टाकत सभात्याग केला. माने यांचीच आता उचलाबांगडी करा, अशी मागणी जिल्हा परिषद आता शासनाकडे करण्याच्या विचारात आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखेंसह सदस्यांचा सभात्याग : सीईओ माने यांची बदली करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 4:17 PM