पिंपळगाव माळवी : अहमदनगर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत बेटी बचाओ-बेटी पढाओ अंतर्गत उत्कृष्ट काम करणाºया नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी शाळेला पुरस्कार देऊन सन्मानित केले.
दहा हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरुप आहे. गटशिक्षणाधिकारी रवींद्र कापरे यांच्या हस्ते हा पुरस्कार बुधवारी प्रदान करण्यात आला. मुख्याध्यापक दत्तात्रय जपे यांनी तो स्वीकारला. यावेळी विस्तार अधिकारी चंद्रकांत सोनार, केंद्रप्रमुख अशोक घुले उपस्थित होते.
पिंपळगाव माळवी शाळेत शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून मुलींसाठी विविध विशेष उपक्रम राबवले. दाखलपात्र वयोगट, स्थलांतरीत मजुरांच्या बरोबर आलेल्या शाळाबाह्य मुला-मुलींना परत शाळेत प्रवेश दिला. शाळेत शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी साप्ताहिक सराव चाचणी, छापील गृहपाठ, अध्यापणात एल.ई.डी. संचाद्वारे शैक्षणिक सॉफ्टवेअरचा वापर, आनंद बाजार इ.उपक्रम राबवले जातात. मुलींसाठी स्त्रीजन्माचा सन्मान, लेक वाचवा-लेक शिकवा विषयावर विविध स्पर्धा, महिला सक्षमीकरण, मुलींचे शिक्षण इ.उपक्रम घेण्यात आले. या सर्व बाबींचा विचार करून शाळेची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.