श्रीरामपूर : महाविकास आघाडी सरकारमधील जिल्ह्यातील तीनही मंत्री समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या प्रश्नावर गप्प बसल्याचा आरोप भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला आहे. सत्ता नसेल तर समन्यायीवर भाषणे केली जातात. मात्र सत्ता मिळताच या प्रश्नाचा विसर पडतो, असा टोला त्यांनी लगावला आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे एका कार्यक्रमात आमदार विखे बोलत होते. जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. समन्यायी वाटप कायद्यामुळे जिल्ह्यावर अन्याय झाला आहे. याविरूद्ध आपण न्यायालयात धाव घेतली आहे. जिल्ह्यातील जे नेते आज मंत्री झाले आहेत. ते सत्तेत नसताना नेहमीच समन्यायीवर आवाज उठवत होते. ते आता गप्प झाले आहेत. ते सत्तेत जाऊन शेतक-यांची यावर मजा पाहत आहेत. महाविकास आघाडी सरकार विकास कामांच्या प्रश्नावर अपयशी ठरले आहे. कोणत्याही कामाबाबत विचारले तर कोरोनाचे कारण पुढे केले जाते. शेतकरी अत्यंत अडचणीत असताना केवळ घोषणा केल्या. त्यांच्या खात्यावर मदतीचा एक रुपयाही अजून पोहोचलेला नाही. त्यांना वा-यावर सोडले गेले, अशी टीका विखे यांनी केली.