अहमदनगर : पालकमंत्री हसन मुश्रीफ व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे दोघेही जिल्ह्यासाठी पुरेसा वेळ देत आहेत. पक्षाचे सर्व आमदारही सक्रिय आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक कार्यक्रम व आंदोलनांना मर्यादा आल्या. पण, यापुढे पक्षवाढीसाठी तळागाळात जाऊन काम करावे लागेल. ज्या जोमाने पक्ष वाढायला हवा तशी वाढ होताना दिसत नाही. पक्षवाढीसाठी अजून खूप संधी आहेत, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचा बुधवारी स्थापना दिन आहे. त्यानिमित्त ‘लोकमत’ने फाळके यांच्याशी विशेष संवाद साधला.
पक्षासमोर जिल्ह्यात काय आव्हाने आहेत? पक्षाची ताकद वाढविणे हेच मोठे आव्हान आहे. आमचे नेतृत्व मोठे व समर्थ आहे. पण, आमदार, खासदार यांची संख्या वाढत नाही तोवर पक्षाचा प्रभाव वाढणार नाही. त्यादृष्टीने बांधणी आवश्यक आहे. कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देणे या बाबी आवश्यक आहेत.
तीन पक्षांचे सरकार असल्याने जिल्ह्यात काही मर्यादा येतात का?नाही. तीनही पक्ष आपापल्या पद्धतीने काम करत आहेत. त्यामुळे एकमेकांचा काहीही अडसर येत नाही. भाजप हा आमचा प्रमुख विरोधक आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस यांची भांडणे होण्याचा अथवा कामात अडसर येण्याचा प्रश्नच येत नाही.
पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्ह्यासाठी वेळ देत नाहीत अशी तुमच्या पक्षात अंतर्गत ओरड आहे का? तसे काहीही नाही. ते पुरेसा वेळ देत आहेत. लॉकडाऊनमुळे कार्यक्रमांना मर्यादा होत्या. शासकीय पातळीवर पालकमंत्री दररोज संपर्कात आहेत. मध्यंतरी शिरुर येथे आमच्या पक्षाची जी बैठक झाली ते नेते व कार्यकर्त्यांचे ‘गेटटूगेदर’ होते. पालकमंत्री व सर्व कार्यकर्त्यांची ओळख परेड व्हावी हा उद्देश त्यापाठीमागे होता.
मंत्री प्राजक्त तनपुरे हे पक्षासाठी वेळ देत आहेत का?नक्कीच. त्यांनी राज्याचा कारभार पाहतानाच जिल्ह्यात बहुतांश तालुक्यात लॉकडाऊनच्या काळातही दौरे केले. त्यांच्यावर विदर्भाच्या दोन तालुक्यांची जबाबदारी आहे. तिकडेही ते संपर्कात आहेत.
तनपुरे यांनी नगर शहरात संपर्क कार्यालय सुरु केले आहे. ही नवीन काही रणनिती आहे का? नगर शहर हे त्यांच्या राहुरी मतदारसंघाच्या दृष्टीनेही मध्यवर्ती केंद्र आहे. संपर्कासाठी चांगले ठिकाण आहे. त्यामुळे त्यांनी शहरात कार्यालय सुरु केले. त्यामागे अन्य काही रणनिती नाही. ती रणनिती पक्ष ठरवत असतो.
शेतकरी अडचणीत आहेत. सरकारने आदेश देऊनही काही शेतक-यांना पीक कर्ज मिळत नाही. शेतमालालाही भाव नाही. याबाबत कुठलाही पक्ष लढताना दिसत नाही? कोरोनामुळे सर्वच बाबींवर मर्यादा आल्या आहेत. अन्य सर्व प्रश्नांपेक्षा सोशल डिस्टन्सिंग पाळण्यास खूप महत्व आहे. त्यामुळे इच्छा असूनही कार्यकर्ते रस्त्यावर उतरु शकत नाहीत. मात्र, समस्या उद्भवली की लागलीच सरकार शेतक-यांसाठी निर्णय घेत आहे. पीक कर्जात अडचणी असतील तर पक्ष नक्की लक्ष घालेल. आमची बांधिलकी ही सतत शेतकरी व जनतेशी आहे.