अहमदनगर : जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. येणारे शंभर दिवस कसोटीचे आहेत. मुख्यमंत्र्यांनी २ एप्रिलपासून लॉकडाऊन करण्याबाबत पूर्वतयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळा-महाविद्यालये, मार्केट आणि गर्दीची ठिकाणे बंद करण्यात येणार आहेत. एप्रिल महिन्यात जिल्ह्यात सहा हजार रुग्ण सक्रिय राहण्याची शक्यता असून, त्यातील निम्म्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्येच भरती करावे लागणार आहे, अशी भीती पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी व्यक्त केली. मात्र, जिल्ह्यात लॉकडाऊनपेक्षा खबरदारी घेण्यावरच प्रशासनाचा भर राहणार असल्याचे मुश्रिफ यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी कोरोनाचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार नीलेश लंके, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्यासह आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री म्हणाले, भारतीय आयुर्वेद संस्थेचे संसर्गजन्य आजार निदान विभागाचे प्रमुख डॉ.रमण गंगाखेडकर यांनी येत्या महिनाभरात देशात किती रुग्ण वाढू शकतात, याचा अंदाज तयार केला आहे. कोरोनाची दुसरी लाट त्सुनामीसारखी असणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. देशातील संभाव्य रुग्णवाढीच्या संख्येशी जिल्ह्याचे प्रमाण पाहता, एप्रिल महिन्याअखेर ६ हजार ३७० रुग्ण हे कोरोना बाधित होतील. त्यातील ५० टक्के रुग्णांना म्हणजे ३ हजार १८३ रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्येच दाखल करावे लागणार आहे. त्यानुसार सध्या जिल्ह्यात २ हजार २६६ इतके बेड सज्ज आहेत. याशिवाय शिर्डी, राहुरी आदी ठिकाणी रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यापैकी १५ टक्के (९५६) रुग्णांना ऑक्सिजनची, तर २ टक्के (२७४) रुग्णांना व्हेंटिलेटरची व्यवस्था करावी लागणार आहे.
सध्या लोकांना कोरोनाची भीती राहिलेली नाही. गृहविलगीकरणाची परवानगी दिली, तर ते नियम पाळत नाहीत. त्यामुळे रुग्णांनी खासगी दवाखान्यात किंवा कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होईल. जिल्हा रुग्णालयात स्वॅब दिल्यानंतर दोन दिवसांत अहवाल देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. महापालिकेतील आरोग्य केंद्रात एकाच ठिकाणी सध्या लसीकरण व कोरोना चाचणी करण्यात येते. आता त्याबाबत वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्याच्या सूचना मुश्रिफ यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या.
----
लोकांना ‘टचाटच’ लस द्यावी
वयाची अट काढून टाकत सरसकट नागरिकांना कोरोनावरील लस दिली पाहिजे. लोकांना ‘टचाटच’ लस दिली पाहिजे, असे पालकमंत्री म्हणाले. याबाबत आम्ही केंद्र सरकारकडे मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. बूस्टर डोससह लसीकरण पूर्ण व्हावे, यासाठी राज्य सरकार आग्रही आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा कमी असून, इंजेक्शन उपलब्ध करणे आवश्यक आहे.
----------
शंभर दिवसांचे नियोजन- जिल्हाधिकारी
प्रशासनाने पुढील शंभर दिवसांचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात एकूण ४७ कोविड सेंटर कार्यरत आहेत. ४ एप्रिलपर्यंत ६,३७० एवढी सक्रिय रुग्णांची संभाव्य संख्या लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवून त्याचे पर्यायी नियोजन करण्यात येणार आहे. महापालिका चौकाचौकात फळे-भाजीपाला उपलब्ध करून देईल. नेप्ती उपबाजारामध्ये फळे-भाज्यांची विक्री करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. हॉटेल, रेस्टारंट आता आठ नंतर बंद राहणार आहेत. त्यामुळे त्यांची पार्सल सुविधाही बंद करण्यात आली आहे. मंगल कार्यालयांमध्ये आता परवानगी घेतल्याशिवाय लग्न करता येणार नाही, तसेच तिथे ५० जणांच्या उपस्थितीची मर्यादा असेल.
---------