कर्जत : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी कर्जत तालुक्यातील सेवा संस्था मतदारसंघात दोन विद्यमान संचालकांमध्येच लढत होत असून याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीकडून मीनाक्षी साळुंके, तर भाजपकडून अंबादास पिसाळ यांच्यात सरळ लढत होत आहे.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे समर्थक व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांच्या पत्नी मीनाक्षी साळुंके व भाजपचे नेते राधाकृष्ण विखे व खासदार डॉ. सुजय विखे यांचे समर्थक अंबादास पिसाळ यांच्यात यावेळी सेवा संस्था मतदारसंघातून निवडणूक होत आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत कर्जत तालुक्यात सोसायटी मतदारसंघात ७४ मतदार आहेत. येथील सेवा संस्था मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध होणार असे शेवटच्या दिवसापर्यंत बोलले जात होते. मात्र काही घडामोडी होऊन येथील जागा बिनविरोध झाली नाही. मिनाक्षी साळुंके व अंबादास पिसाळ हे दोन्ही उमेदवार जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आहेत. गेल्या निवडणुकीत अंबादास पिसाळ यांनी सेवा संस्था मतदारसंघातून विक्रम देशमुख यांचा पराभव केला होता. तर मिनाक्षी साळुंके यांनी महिला राखीव मतदारसंघातून सुरेखा कोतकर यांचा पराभव केला होता.
देशमुख घराणे चाळीस वर्षात बँकेच्या निवडणुकीतून प्रथमच बाहेर राहिले. आता हे देशमुख घराणे कोणाच्या पारड्यात वजन टाकतात यावरही विजयाचे गणित ठरणार आहे. साळुंके यांच्या विजयासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार रोहित पवार, बाळासाहेब साळुंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, राशीनचे उपसरपंच शंकरराव देशमुख आदी प्रयत्नशील आहेत. पिसाळ यांच्या विजयासाठी भाजपचे नेते राधाकृष्ण विखे, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे यांनी फिल्डिंग लावली आहे. विजयी आकडा पार करण्यासाठी दोन्ही उमेदवारांनी मतांची जुळवाजुळव सुरू केली आहे. काही मतदार सहलीला गेले आहेत, तर काहींनी अद्याप घर सोडले नाही हे विशेष. जादुई आकडा पार करण्यासाठी दोन्ही बाजूंनी वैयक्तिक भेटीगाठी बैठका यावर भर दिला जात आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील सहकारातील नेत्यांना व कार्यकर्ते यांना महत्त्व आले आहे.
पासपोर्ट फोटो : १७ अंबादास पिसाळ, १७ मीनाक्षी साळुंके