अहमदनगर - जिल्हांतर्गत बदलीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत आज बुधवारी संपत आहे़ मात्र बदलीपात्र शिक्षकांच्या याद्यांचा गोंधळ अद्याप सुरूच असून, आता जिल्हास्तरावर याद्या प्रसिद्ध करण्याचा आदेश शिक्षण विभागाला मंगळवारी सायंकाळी प्राप्त झाला आहे. त्यामुळे प्रक्रिया सुरू होऊनही याद्यांचा गोंधळ सुरूच असल्याने शिक्षकांचा जीव टांगणीला लागला आहे.
जिल्हांतर्गत बदलीप्रक्रिया सुरू झाली आहे़ शिक्षण विभागाच्या पोर्टलवर आॅनलाइन अर्ज दाखल करण्याचा बुधवारी अखेरचा दिवस आहे. बदलीप्रक्रिया सुरू होण्यापूर्वी बदलीपात्र शिक्षक आणि त्यांच्या शाळांची यादी प्रसिद्ध करणे बंधनकारक असते़ कारण ज्या शाळेतील शिक्षक बदली पात्र आहे, अशा शाळेची निवड अर्ज दाखल करताना करावी लागते़ जिल्ह्यातील ७ हजार ३४३ शिक्षक बदलीसाठी पात्र आहेत़ या शिक्षकांच्या याद्या शिक्षण विभागाने सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्या आहेत. तसेच त्या तालुक्याला पाठविण्यात आल्या आहेत. त्यावर हरकतीही मागविण्यात आल्या असल्याचा दावा शिक्षण विभागाकडून केला जात आहे. परंतु उपलब्ध झाल्या नसल्याची शिक्षकांची तक्रार आहे. त्यामुळे त्यांना शाळा निवडणे कठीण होऊन बसले आहे. जिल्ह्यात आॅनलाइन याद्यांचा गोंधळ सुरू असतानाच आता जिल्हास्तरावरही याद्या प्रसिद्ध करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे गोंधळात अधिकच भर पडली आहे.गतवर्षी जिल्हांतर्गत बदलीला उशीर झाला होता़ त्यामुळे चालूवर्षी शिक्षण विभागाने बदलीप्रक्रिया वेळेत सुरू केली. बदलीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांची संख्याही मोठी आहे. जिल्ह्यातील सुमारे ११ हजार शिक्षक आहेत. त्यापैकी ७ हजार शिक्षक बदलीस पात्र आहेत. त्यामुळे चालूवर्षी सर्वाधिक बदल्या होणार आहेत. सर्वप्रथम सवर्ग एकमधील शिक्षकांना प्राधान्य आहे. त्यांची अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या बुधवारी संपणार आहे. मात्र बदलीपात्र शिक्षकांच्या यादीच्या गोंधळामुळे अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. जिल्हास्तरावरील शिक्षकांना जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात पाहायला मिळणार आहे़ त्यानुसार त्यांना शाळांची निवड करता येणार आहे.
बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्या आहेत़ त्याचबबरोबर तालुक्याच्या ठिकाणही प्रसिद्ध झाल्या असून, नव्याने जिल्हास्तरावर यादी प्रसिद्ध करण्याचा आदेश प्राप्त झालेला आहे. -रमाकांत काठमोरे, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदबदलीपात्र शिक्षक असेअकोले-५४२जामखेड-२७५कर्जत-४३९कोपरगाव- ३८४नगर शहर-६३नगर तालुका-५९२नेवासा-६७४पारनेर-६८२पाथर्डी-५३०राहाता-४०९राहुरी-४८८संगमनेर-८२०शेवगाव-३५३श्रीगोंदा-७६४श्रीरामपूर-३२९