वेल्हे तालुक्यातील तोरणा गिरिदुर्गावर भटकंतीचा बेत जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून आखला गेला. उपक्रमात पैठण (औरंगाबाद) येथील शिवुर्जा प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गाडे, अंजली प्रधान (नाशिक), जनार्दन पानमंद (रायगड), केशव भांगरे (अकोले, अहमदनगर), विनोद माहोर (पुणे) हे पाच दुर्गवीर सहभागी झाले होते.
अतिदुर्गम व अतिकठीण तोरणा किल्ला चढण्यास व उतरण्यास भल्या भल्या ट्रेकरचा घाम निघतो; परंतु दिव्यांग व्यक्ती ही कमजोर नसून त्यांच्यातही प्रचंड मोठी ऊर्जा व क्षमता असते हे दाखवून देण्यासाठी या साहसी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते, असे केशव भांगरे यांनी सांगितले. ३ डिसेंबरला सकाळी दहा वाजता वेल्हे गावातून तोरणा किल्ला चढाईस सुरुवात केली. एकमेकास आधार व प्रोत्साहन देत तब्बल चार तासांच्या कठीण चढाईनंतर दुपारी दोन वाजता गडाचा पहिला दरवाजा गाठला. गड व दुर्ग पूजन करण्यात आले. गडाच्या बालेकिल्ल्यावरील मेंगाई देवीच्या मंदिरात पूजा करून जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला.
गडावरील बुधला माची, झुंजार माचीसह सर्व ऐतिहासिक वास्तूंवर नतमस्तक होत, तब्बल दोन तास गडफेरी करण्यात आली. या संपूर्ण दुर्ग अभ्यास भटकंतीनंतर परतीचा प्रवास अवघ्या दोन तासांत पूर्ण झाला. अपरिचित जंगलातून चालताना या दिव्यांगांनी तब्बल १५ किलोमीटरपेक्षाही जास्त पायपीट केली.
..............
राज्यातील व राज्याबाहेरील ६८ गडकिल्ले- उंचावरील निसर्ग पर्यटनस्थळे पादाक्रांत केली आहेत. दरवर्षी अपंग दिन गडकिल्ला सर करून साजरा करतो. दिव्यांग गिर्यारोहकांची साथ मिळते.
- केशव भांगरे, अकोले