सुधीर लंकेअहमदनगर : शि वसेनेला धडा शिकविण्यास निघालेल्या राष्टÑवादीने स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतल्याचे महापालिका निवडणुकीनंतरच्या राजकारणातून स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीत जगताप व कळमकर असे दोन गट पडल्याचे जाणवू लागले आहे. अर्थात शरद पवार या दोन्हीही गटांवर यापुढे विश्वास दर्शवतील का? याबाबतही शंका आहे.राष्टÑवादीचे आमदार संग्राम जगताप यांची महापालिका निवडणुकीनंतरची रणनिती काहीशी शेखचिल्लीसारखी ठरली आहे. राष्टÑवादीत त्यांची स्थिती भक्कम होती. मात्र, स्वत: ज्या फांदीवर ते आरामात बसले होते, त्याच फांदीवर त्यांनी घाव घातले. शिवसेनेशी त्यांचे वैर होते हे नक्की. पण, सेनेला धडा शिकविण्याच्या नादात त्यांनी कपाळमोक्ष करुन घेतला आहे. महापालिकेच्या सत्तेतील सहभागाचा फायद्यापेक्षा त्यांना तोटा होऊन बसला आहे.केडगाव येथील दोन शिवसैनिकांच्या हत्याकांडानंतर शिवसेनेने राष्टÑवादीच्या नेत्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. या गुन्ह्यात व त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयावर झालेल्या हल्ला प्रकरणात राष्टÑवादीच्या अनेक नेत्यांची व कार्यकर्त्यांची धरपकड झाली. यामुळे राष्टÑवादी सैरभैर झाली होती. जगताप यांना याप्रकरणात अटकही झाली. या गुन्ह्यात शिवसेनेने नको त्यांना गोवले, असा राष्ट्रवादीचा आरोप आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेची सत्ता येऊ द्यायची नाही, असा राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्या सूडापोटी राष्टÑवादीने भाजपला साथ दिली. हे झाले वरवर दिसणारे राजकारण. मात्र, भाजपचा संग्राम जगताप यांच्यावर व कोतकर कुटुंबावरही प्रचंड दबाव होता. त्या मजबुरीमुळे भाजपसोबत जाण्याशिवाय या दोन्ही कुटुंबांकडे पर्याय नव्हता असेही बोलले जाते.या सर्व राजकारणात भाजपचा फायदा झाला. मात्र, राष्टÑवादीला मोठी किंमत मोजावी लागली. शरद पवार देशभर मोदी यांच्या विरोधात जुळवाजुळव करत आहेत. अशावेळी जगताप यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याने थेट पवारांच्या विश्वासार्हतेबाबत शंका उपस्थित झाली. त्यामुळे जगताप यांच्यावर व नगरसेवकांवर कारवाई केल्याशिवाय राष्ट्रवादीकडे दुसरा पर्यायच नाही, अशी परिस्थिती आहे. स्वत: शरद पवार नाराज म्हटल्यावर जगताप यांच्यापासून आता सगळेच दूर झाले. या निर्णयाशी आपला काहीही संबंध नाही, असे दादा कळमकर यांनीही स्पष्ट केले आहे. जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील हे कोणीही जगताप यांच्यासोबत दिसत नाही. पक्षाने जगताप यांच्यावर कारवाई केलीच, तर नगर राष्टÑवादीचे नेतृत्व कोणाच्या हाती येणार ही चर्चा आतापासूनच सुरु झाली आहे. जगताप-कळमकर या दोघांच्याही समर्थकांत सोशल मीडियावर जे युद्ध पेटले आहे त्यामागे हेही एक कारण आहे. जगतापांना पक्षाने दूर केले तर दादा कळमकर व त्यांचे पुतणे अभिषेक कळमकर पक्षाची शहरातील सूत्रे ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतील. जगताप यांच्यामुळे कळमकर यांनाही मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे जगताप यांच्यावर कारवाई झाली, तर कळमकर समर्थकांना कदाचित ते हवेही असणार. अर्थात कळमकर यांनी मंत्री गिरीश महाजन यांचे पुष्पगुच्छ देऊन जे स्वागत केले तेही पवारांना खटकले आहे. मुंबईतील बैठकीत त्यांनी ही बाब बोलून दाखवली. पवार प्रथमच कळमकर यांच्याबाबतही नाराज दिसले.भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांना राष्टÑवादीने सतत जपले आहे. जिल्हा बँकेत राष्टÑवादीची सत्ता आहे. मात्र, तेथे कर्डिले यांचा शब्द अंतिम मानला जातो. राष्टÑवादीच्या सर्वच नेत्यांनी (अपवाद प्रसाद तनपुरे) कर्डिले यांच्यासोबतची मैत्री जपली. कर्डिले यांनी महाजन यांना आपल्या घरी आणून मैत्रीत घात केला, असे आता कळमकर यांचे म्हणणे आहे. मात्र, ऐन महापौर निवडीच्या दिवशी मंत्री आपल्या घरी का येत आहेत हे कळमकर यांच्या ध्यानात येऊ नये, एवढे कळमकर भोळे कसे? नेत्यांच्या मैत्रीत सामान्य कार्यकर्ते होरपळले तेव्हा नेते शांत होते. आता नेत्यांवरच होरपळण्याची वेळ आली. कर्डिले, कोतकर, जगताप या सोयºयांच्या मैत्रीत कळमकर सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेऊन होते. मात्र, त्या संबंधांना आता तडा गेला आहे. राष्टÑवादी शहरात मजबूत झाली होती. मात्र, आता जगताप-कळमकर यांच्यात दुहीची चिन्हे आहेत.
नगर राष्ट्रवादीत दुफळी
By सुधीर लंके | Published: January 11, 2019 11:09 AM