अहमदनगर : हुंड्यासाठी शारीरिक, मानसिक छळ करून घरातून हाकलून देत मोबाइल फोनवर मेसेज पाठवत तलाक देण्याची धक्कादायक घटना भिंगार येथे घडली. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिंगार (मोमीन गल्ली) येथील महिलेचा तीन वर्षांपूर्वी रायमोह (ता. शिरूर कासार, जि. बीड) येथील खालिद ख्वाजा सय्यद याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर नोकरीला लावून देण्यासाठी पतीच्या घरच्यांकडून विवाहितेकडे पैशाची मागणी होत होती. हे पैसे न दिल्याने पतीने विवाहितेस दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच उपाशीपोटी ठेवून घरातून हाकलून दिले. हा छळ १ एप्रिल २०१८ ते २६ ऑगस्ट २०२१ या दरम्यान सुरू होता. छळास कंटाळून ही विवाहिता माहेरी भिंगार येथे आली असता पतीने मोबाइलवर तीन वेळेस तलाक असा मेसेज पाठवून विवाहितेस तलाक दिला.
या प्रकरणी विवाहितेने १ सप्टेंबर २०२१ रोजी भिंगार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पती खालिद ख्वाजा सय्यद, सासरे ख्वाजा मैमुद्दीन सय्यद, दीर परवेज ख्वाजा सय्यद, सासू परवीन ख्वाजा सय्यद, सासूची आई सुग्राबी जाफर सय्यद (सर्व रा. रायमोह, ता. शिरूर, जि. बीड) यांच्याविरोधात भादंंवि ४८८, ३२३, ५०४, ५०६, ३४, तसेच मुस्लिम महिला विवाह संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.