पाथर्डी : तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे. खरवंडी कासार परिसरातील भगवानगड लमाण तांड्यावर एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला. या घटनेत दिव्यांग पतीने पत्नीला बिबट्याच्या हल्ल्यातून वाचविले. तर दुसऱ्या घटनेत कोरडगाव येथे बिबट्याने हल्ला करीत शेळीला ठार केले. या दोन्ही घटना शनिवारी दुपारी ४ ते ५ वाजेदरम्यान घडल्या.
छबूबाई एकनाथ राठोड (वय ४५, रा. भगवानगड लमाण तांडा) असे बिबट्याने हल्ला केलेल्या महिलेचे नाव असून तिच्यावर खरवंडी कासार येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
छबूबाई राठोड व त्यांचे पती एकनाथ दासू राठोड हे दोघे भगवानगड लमाण तांडा परिसरातील त्यांच्या शेतात काम करत होते. दुपारी चार वाजता बिबट्याने शेतात काम करत असलेल्या छबूबाई यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या चेहऱ्यावर बिबट्याने पायाचा पंजा मारला. जवळच असलेल्या एकनाथ राठोड यांनी बिबट्याच्या तोंडावर काठीचा जोराचा फटका मारला व आरड्याओरडा केला. त्यामुळे बिबट्या पळून गेला.
कोरडगाव येथील ग्रामपंचायत सदस्य अविनाश बंड यांच्या शेतात चरणाऱ्या शेळीवर बिबट्याने हल्ला करुन ठार केले.