शेखर पानसरे ।
संगमनेर : दिव्यांग असलेल्या पायल संजय घोडेकर हिने पुस्तकांना मित्र केले. रात्रीचे दिवस करत तिने दहावीत ८८. ४० टक्के गुण मिळवित दिव्यांग विभागात संगमनेर तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. फिटरच्या मुलीने वडिलांच्या कष्टाचे चीज करत उज्ज्वल यश संपादन केले.
संजय रंगनाथ घोडेकर हे जोर्वे रस्त्यावर घोडेकर मळ्यात पत्नी सिमा, मोठी मुलगी पायल, लहान मुलगी समिक्षा यांच्यासमवेत राहतात. व्यवसायाने फिटर असलेल्या संजय घोडेकर यांनी अकोले रस्त्यावर भाडेतत्वावर जागा घेऊन काही वर्षांपूर्वी गॅरेज सुरू केले. कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना घोडेकर कुटुंबासमोर एक संकट उभे राहिले. पायल आठवीत असताना तिला डाव्या डोळ्याने कमी दिसायला लागले. वडिलांनी तिला संगमनेर, नाशिक , पुणे येथील नेत्ररोग तज्ज्ञांकडे नेले. कष्ट करून मिळणारा पैसा पायलच्या उपचारासाठी खर्च होत होता.
पुण्यातील एका नामांकित रूग्णालयात तिच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. हातावर पोट असलेल्या घोडेकर कुटुंबाने तिच्या उपचारासाठी आतापर्यंत साडेचार लाख रुपये खर्च केले. मात्र, तरीही डोळ्याने कमी दिसत होते. असे असताना देखील पायल आठवी व नववीत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाली. दहावीला गेल्यानंतर पुन्हा डोळ्याचा त्रास सुरू झाला. उपचारासाठी वारंवार पुण्याला जावे लागत असल्याने तिला शाळेत जाता येत नव्हते, अभ्यासही बुडत होता.
आतापर्यंत पायलचा डाव्या डोळ्यावर चार शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तिला त्या डोळ्याने काहीही दिसत नाही. अभ्यास बुडाला, दहावीचे वर्ष वाया जाईल. चांगले गुण मिळणार नाहीत. या भितीने ती रडायची. आधार फाउंडेशनचे सदस्य शिक्षक सुखदेव इल्हे, दिगंबर गणेश सराफ विद्यालयाचे प्राचार्य विजय कोडूर यांसह अनेकांनी तिला आधार दिला. आधार फाउंडेशनने शालेय साहित्यांबरोबरच आर्थिक मदतही केली. पायल जिद्द ठेवत अभ्यास केला. उजव्या डोळ्याने वाचावे लागत असल्याने त्यावरही ताण येऊ लागला. परंतु पायलने कधीही अभ्यासात खंड पडू दिला नाही. अभ्यास करत वाया गेलेला वेळ भरून काढला. जिद्द, चिकाटी, प्रयत्न या जोरावर तिने दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळविले आहे. आकृती काढायला अडचण येते म्हणून ती विज्ञान शाखा घेणार नव्हती. पण समुपदेशानंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. देवेंद्र अमृतलाल ओहरा कनिष्ठ महाविद्यायात अकरावीला विज्ञान शाखेत तिने प्रवेश घेतला आहे.
अडचणी आल्या तरी मागे हटणार नाही. आयुष्यात जिद्दीने लढणार आहे. भविष्यात जिल्हाधिकारी व्हायचं आहे. -पायल संजय घोडेकर.