अहमदनगर : दिवाळीनिमित्त विविध आकारातील रंगीबेरंगी आणि आकर्षक डिझाईन असलेल्या पणत्यांनी बाजारपेठ सजली आहे़ नावीन्यपूर्ण आणि नाजूक आकारातील पणत्या घेण्याकडेच ग्राहकांचा कल आहे़ गुजराथ, राजस्थान येथील तसेच चीनी पणत्याही बाजारात दाखल झाल्या आहेत़दिवाळी सणात आठ ते दहा दिवस घर, अंगण, छतावर तसेच व्यवसायाच्या ठिकाणी मातीच्या पणत्या लावण्याची परंपरा आहे़ दिवाळीच्या आधी चार ते पाच दिवस पणत्यांची खरेदी केली जाते़ शहरातील टिळक रोड, माळीवाडा, चौपाटी कारंजा, कापड बाजार, नवीपेठ, गंजबाजार, गांधी मैदान, प्रोफेसर चौक, पाईपलाईन रोड, दिल्लीगेट, झोपडी कॅन्टीन यासह विविध चौकात पणत्यांचे मोठमोठे स्टॉल लागले आहेत़मातीच्या पणत्यांसह गोल्ड प्लेटेड आणि कॅण्डल पणत्याही उपलब्ध आहेत़ फुले, पंचपाळ, समई, नारळ, तुळशीवृंदावन, नंदादीप, लक्ष्मीच्या हातातील दिवा या आकारातल्या आणि नक्षीकाम असलेल्या पणत्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत़साध्या पणत्या २० रूपये ते विविध आकारातील नक्षीकाम असलेल्या पणत्या २०० रूपये डझनपर्यंत विकल्या जात आहेत़ चीनी माती आणि लाकडापासून तयार केलेले एकत्रित पणत्यांचे आकर्षक ताट महिला वर्गांचे लक्ष वेधून घेत आहे़रेडिमेड दिव्यांची चलतीमाती, लाकूड, पत्रे यापासून तयार केलेल्या पणत्यांसह पणत्यांच्या आकारातील रेडिमेड इलेक्ट्रॉनिक दिव्यांनाही मोठी मागणी आहे़ या दिव्यांमध्ये तेल टाकावे लागत नाहीत़ त्याच्यात बसविलेल्या बॅटरीवर त्यातला दिवा लागून तो पणतीसारखाच दिसतो़मातीच्या पणतीलाही पसंतीपारंपरिक पद्धतीने स्थानिक कारागिरांकडून तयार करण्यात येणाऱ्या मातीच्या पणत्यांचीही ग्राहकांमध्ये क्रेझ कायम आहे़ साध्या आकारातील या पणत्या खरेदी करून महिला घरी त्यांना आकर्षक सजावट करतात़ इतर रेडिमेड पणत्यांपेक्षा स्थानिक कारागिरांनी तयार केलेल्या पणत्या स्वस्त आहेत़मातीच्या पणत्यांसह रेडिमेड आणि आकर्षक डिझाईन असलेल्या पणत्यांना ग्राहकांची मागणी आहे़ मातीच्या पणत्या स्थानिक ठिकाणाहून तर इतर पणत्या परराज्यातून नगरमध्ये आणल्या जातात़ पणत्या खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे़ - सालचाबाई शिंदे, विक्रेत्या
दिवाळी २०१८ : रंगीबेरंगी, नक्षीदार पणत्यांनी सजली बाजारपेठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 12:38 PM