अहमदनगर : दिवाळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने खरेदीसाठी बाजारपेठेत रविवारी मोठी गर्दी झाली होती़ रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत बाजारपेठ हाऊसफुल्ल होती,दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण असल्याने घरोघरी कपड्यांसह दागिने, घरगुती वस्तू, वाहन, सजावटीचे साहित्य खरेदी केले जाते़ रविवार सुट्टीचा दिवस आल्याने बाजारात सकाळी नऊ पासूनच ग्राहकांची गर्दी झाली होती़ शहरातील कापडबाजार, नवी पेठ, चितळे रोड, बागडपट्टी, माळीवाडा परिसर, प्रोफेसर चौक, बालिकाश्रम रोड, कोठी रस्ता यासह विविध दुकानात ग्राहकांची मोठी गर्दी दिसत होती़ दिवाळीनिमित्त गेल्या आठ दिवसांत बाजारात चांगलेच चैतन्य निर्माण झाले आहे़ रविवारी पूजेसाठी लागणाऱ्या पणत्या-बोळके, लक्ष्मीपूजनासाठी लागणारी केरसुणी, महालक्ष्मीची मूर्ती आदी साहित्य खरेदी करण्यासाठी महिला वर्गाची गडबड दिसत होती़कपड्यांच्या दुकानात तर आठ दिवसांपासून गर्दी दिसत आहे़ लहान मुलांसाठी फॅन्सी कपडे खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. कॉटन शर्ट, जीन्सबरोबरच दिवाळीचे आकर्षण असलेल्या पारंपरिक पोशाख खरेदीला पसंती मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.चौकाचौकात पोलीस पथक तैनातदिवाळीनिमित्त शहरात होणारी गर्दी व वाहतूक सुरळीत करण्यासाठी तसेच चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शहरात चौकाचौकात फिक्स पॉर्इंट लावण्यात आले असून, पोलीस बळ तैनात करण्यात आले आहे़ रविवारी दिल्ली गेट, अमरधाम, मार्केटयार्ड, स्वस्तिक चौक आदी ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती़ वाहतूक पोलिसांनी मात्र ही कोंडी सुरळीत केली़
दिवाळी स्पेशल : दिवाळीनिमित्त बाजारपेठ हाऊसफुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 12:55 PM