अण्णा नवथर , अहमदनगरसंपूर्ण जगाला अध्यात्माची गोडी लावणाऱ्या ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना प्रवरेच्या तिरावर नेवासा शहरात झाली़ मात्र गं्रथराज ज्ञानेश्वरी रचनेचा साक्षीदार असलेला पैस खांब गेली कित्येक वर्षे सरकारी यंत्रणेच्या लेखी अडगळीत पडून होता़ अखेर तीर्थक्षेत्र विकासाच्या फायलींवरील धूळ झटकली गेली आणि सुशोभिकरणाच्या रुपाने विकासाची जणू गंगाच नेवासा शहरात अवतरली़ सर्व कामे पूर्ण होतील तो दिवस भक्तांसाठी सोनियाचा दिनू ठरणार आहे़ त्यामुळे दुर्लक्षित तीर्थक्षेत्राला एक नवी झळाळी मिळणार असल्याची भावना भक्तांकडून व्यक्त होत आहे़ श्री़ संत ज्ञानेश्वर महाराजांनी श्री़ गं्रथराज ज्ञानेश्वरीची रचना केली़ पुढे या ग्रंथाची ख्याती जगभर पसरली़ ज्ञानेश्वरीने मराठीचा झेंडा अटकेपार फडकविला़ गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आणि विदेशातही ज्ञानेश्वरीचे पारायण भक्तीभावाने केले जाते, अशी ही जगतविख्यात ज्ञानेश्वरी नेवासा शहरात तयारी झाली़ असे असले तरी तीर्थक्षेत्राचा हवा तेवढा विकास झाला नाही़ देहू, आळंदी, पंढरपूर तीर्थक्षेत्रात नेवासा तीर्थक्षेत्राचा समावेश आहे़ या चारही तीर्थक्षेत्रांना एकत्रित निधी मिळतो़ या निधीतून संत ज्ञानेश्वर तीर्थक्षेत्रासाठी सुमारे १२ कोटींचा निधी मिळाला़ पण, सरकारी काम आणि सहा महिने थांब, या म्हणीची प्रचिती प्रशासनाने दिलीच़ औरंगाबाद ते पुणे रस्त्यावरून संत ज्ञानेश्वर मंदिराकडे रस्ता जातो़ हा रस्ता अरुंद होता़ तो रुंद करण्यात आला़ राजकमल कृषी केंद्र ते नेवासा ग्रामपंचायत कार्यालय रस्ता २१ मीटर रुंद झाला़ ग्रामपंचायत कार्यालय ते संत तुकाराम महाराज मंदिरापर्यंत रस्ता १४ मीटर रुंद बनविण्यात येणार आहे़ ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता प्रशस्त होणार आहे़ रस्त्यांवर विद्युत रोषणाईचेही काम हाती घेण्यात आले आहे़ भक्तांचा प्रवास यामुळे सुखकर होणार आहे़ भविष्यातील भक्तांची वाढणारी गर्दी लक्षात घेवून मंदिर परिसरात वारकरी सुविधा केंद्राचे काम सुरू आहे़ मागील बाजूस सुसज्ज उद्यानाची निर्मिती करण्यात येत आहे़ उद्यानात संत ज्ञानेश्वर यांचे शिल्प, समोर ज्ञानेश्वरी आणि बाजूला सच्चिदानंद महाराज, असे शिल्प बसविण्यात येणार आहे़
विकासाच्या स्पर्शाने उजळणार ज्ञानेश्वर नगरी!
By admin | Published: August 24, 2016 12:21 AM