अहमदनगर : ऐतिहासिक वस्तू संग्रहालयातून ज्ञानेश्वरीची जुनी प्रत आणि जुनी वजन-मापे चोरणाऱ्या दोघांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम.एस. तोडकर यांनी दोन दिवसांच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी असलेल्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयातून आठ ते दहा दिवसांपूर्वी जुनी ज्ञानेश्वरीची प्रत आणि जुनी वजन-मापे चोरीला गेली होती. या प्रकरणी संग्रहालयाचे अभिरक्षक संतोष यादव यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. मात्र चोरीचा नेमका काय उद्देश होता, ज्ञानेश्वरीची प्रत चोरून चोरट्यांना काय साध्य करायचे होते, ही बाब गुलदस्त्यातच राहिली. दरम्यान पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील यांच्या विशेष पथकाने शहरात कोम्बिंग आॅपरेशन सुरू केले आहे. त्या दरम्यान दोन चोरटे पोलिसांच्या हाती लागले. संशयित म्हणून अमित सुरेश भिंगारदिवे आणि हरेश सुरेश भिंगारदिवे यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता ऐतिहासिक वस्तू संग्रहालयातील ज्ञानेश्वरीची प्रत आणि वजन मापे चोरल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल गोरक्षनाथ लोखंडे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
‘ज्ञानेश्वरी’ चोरणारे कोठडीत
By admin | Published: September 17, 2014 11:22 PM