भेंडा : २०२०-२१ या वर्षात लोकनेते मारूतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याने सर्वांच्या सहकार्याने ऊसाचे उच्चांकी गाळप करून हंगाम यशस्वी केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र घुले यांनी दिली. यंदा कारखान्याने १४ लाख ५१ हजार मेट्रिक टन ऊस गाळप केले. कारखान्याने राज्यात चौथ्या क्रमांकाचे ऊस गाळप केले, असेही त्यांनी सांगितले.
कारखान्याचा ४७ वा गळीत हंगाम सांगता समारंभ बुधवारी झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले, उपाध्यक्ष पांडुरंग अभंग, देसाई देशमुख आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी नरेंद्र घुले म्हणाले, सर्व ऊस उत्पादक, कारखाना कामगार, ऊसतोड कामगार, वाहतूकदार, संचालक मंडळ यांच्या सहकार्याने १४ लाख ५१ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून १५ लाख ६१ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले. ज्ञानेश्वर कारखान्याने राज्यात सहकारी साखर कारखानदारीत ऊस गाळपात चौथा क्रमांक मिळविला आहे. यासाठी प्रत्येकाचे प्रामाणिक प्रयत्न व योगदान महत्त्वाचे आहे.
या हंगामात १० कोटी ५० लाख युनिट वीज निर्मिती झाली. ६ कोटी ६१ लाख युनिट वीज निर्यात केली आहे. कारखाना ही मातृसंस्था असून त्यावर अनेकांचे प्रपंच अवलंबून आहेत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी काकासाहेब नरवडे, विठ्ठलराव लंघे, बबनराव भुसारी, मच्छिंद्र म्हस्के, डाॅ. क्षितिज घुले, शिवाजी कोलते, अशोक मिसाळ, डाॅ. शिवाजी शिंदे, दत्तात्रय काळे, गणेश गव्हाणे, तुकाराम मिसाळ, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सचिव रवींद्र मोटे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.