पाथर्डी : पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीला विरोधकांकडून जाणीवपूर्वक टार्गेट करुन बदनाम केले जाते. समितीविरूध्द जे सत्याग्रहाला बसले त्यांनीच अतिक्रमण केले आहे. केलेले अतिक्रमण जिरले पाहिजे यासाठी त्यांचा खटाटोप सुरू आहे. तुमच्या ताब्यात असलेल्या संस्था कशा पघ्दतीने चालतात हे अगोदर पहा, अशी टीका केदारेश्वर साखर कारखान्याचे अघ्यक्ष प्रताप ढाकणे यांनी विरोधकांवर करुन आमच्या नादाला लागू नका, नाद खुळा करीन, अशा शब्दात सुनावले.कृषी उत्पन्न बाजार समिती प्रताप ढाकणे यांच्या ताब्यात आहे. चार दिवसापूर्वी बाजार समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत सहाय्यक निबंघक कार्यालयात बैठा सत्याग्रह केला होता. त्या पार्श्वभूमीवर ढाकणे पत्रकारांशी बोलत होते.ढाकणे म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार पारदर्शक पघ्दतीने चालू असून जनतेने आम्हाला सत्ता दिली त्याच्या वेदना आजही विरोधकांना होत आहेत. सगळया संस्था आम्हालाच पाहीजेत, राजकारण टिकले पाहीजे ही विरोघकांची भूमीका आहे. त्यामुळे ते विनाकारण आम्हाला बदनाम करीत आहेत. तिसगावमधील गाळे वाटपाबाबत आमच्यावर आरोप केले, परंतु त्या ठिकाणचा एकही गाळा दिलेला नाही. पाथर्डी येथील फक्त दोन भूखंड दिले असून ते ले-आउट मध्ये आहेत. कोणतेही बेकायदेशीर काम बाजार समितीकडून झालेले नाही. आमची सीबीआय चौकशी करा, त्या चौकशीला सामोरे जायला आम्ही तयार आहोत. जे सत्याग्रहाला बसले होते ते रात्री आम्हाला फोन करून सांगत आहेत की आम्हाला आदेश देण्यात आले होते. बदनाम करा, असे सांगितले. नाविलाजाने आम्ही सत्याग्रहाला बसलो.राजकारण जरूर करा, तुमच्या पध्दतीने करा, परंतु संस्था टिकल्या पाहीजेत ही आमची भूमीका आहे. अनेक कारखाने विकलेत, परंतु केदारेश्वर नाही विकला. आम्हाला प्रचंड त्रास झाला, परंतु आम्ही ठाम राहीलो. तुमच्या ताब्यात असलेला वृध्देश्वर कारखाना मागील वर्षी थकबाकीत होता. तुमच्या ताब्यात असलेल्या खरेदी विक्री संघात भ्रष्टाचार सिध्द झाला मग गुन्हा का दाखल करीत नाही. आमदार आहात म्हणून दबाब टाकता. तुमच्या समर्थकांचे अतिक्रमण अगोदर काढा. श्रमदान आम्हीही केले, परंतु आम्ही प्रसिध्दीपासून दूर राहिलो, असा टोला ढाकणे यांनी लगावला.कृषी उत्पन्न बाजार समिती आमच्या ताब्यात आली त्यावेळी १२ लाख रूपये तोटा होता त्यानंतर आवश्यक २७ लाख रूपये खर्च करून ३१ मार्च १८ अखेर बाजार समितीला १ कोटी १४ लाख रूपयांचा नफा झाला.