अहमदनगर : नारायण राणेंबद्दल प्रश्न विचारू नका असे म्हणत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद आटोपटी घेतली.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. सकाळी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हा विभाजनावर सरकार सकारात्मक असल्याचे पाटील यांनी सांगितले़ जिल्हा आणि तालुका विभाजनाचे अनेक प्रस्ताव सरकारकडे आलेले आहेत. मात्र ते अद्याप पाहिले नाहीत. अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असल्याने सरकार विभाजनाबाबत सकारात्मक असल्याचे पाटील यांनी सांगितले.गेल्या अनेक वर्षांपासून बाह्यवळण रस्त्याचे काम रखडले आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधीही मंजूर होता. मात्र, वर्क आॅर्डर नसल्यामुळे रस्त्याचे काम सुरु होत नव्हते. तथापि, नगरकरांच्या वाढत्या दबावामुळे बांधकाम विभागाने या मार्गाची दुरुस्ती सुरु केली आहे. आता पाटील यांच्या हस्ते बाह्यवळण रस्ता दुरुस्ती कामाचा महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री पाटील यांच्या हस्ते शुभारंभ झाला. त्यानंतर पाटील बांधकाम खात्याच्या इको बिल्डिंगची पाहणी केली. यावेळी त्यांनी हरित इमारत संकल्पनेवर आधारित या इमारतीची रचना, बैठक व्यवस्था, प्रकाश व्यवस्थांबाबत संबंधितांचे कौतुक केले.
राणेंबद्दल विचारू नका, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी नगरमधील पत्रकार परिषद गुंडाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 11:11 AM