जामखेड : शासकीय आदेश नसतानाही नगरपरिषद प्रशासनाने सायंकाळी सहानंतर शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. तशी माहिती दोन दिवसांपासून शहरात रिक्षा लावून शहरात ध्वनिक्षेपकाद्वारे माहिती दिली जात आहे. या निर्णयाला शहरातील व्यापारी, दुकानदार यांनी विरोध दर्शविला आहे. सायंकाळी दुकाने बंद ठेऊ नका, अशी मागणी केली आहे.
शहरातील व्यापारी, दुकानदारांनी युवक काँग्रेसचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष राहुल उगले यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार विशाल नायकवाडे यांना याबाबतचे निवेदन दिले.
जामखेड शहरातील नगरपरिषद प्रशासनाने दहा दिवसांपूर्वी ठरावीक व्यापाऱ्यांची बैठक घेऊन शनिवारी जनता कर्फ्यू व इतर दिवशी सायंकाळी अत्यावश्यक सेवा वगळता, इतर सर्व दुकाने सायंकाळी बंद करण्याचा निर्णय घेतला होता, तरीही काही व्यापारी दुकाने चालू ठेवीत असे. याकडे नगरपरिषदेकडून दुर्लक्ष करून छोट्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली जात असे. या निर्णायास शहरातील दुकानदारांनी विरोध दर्शविला.
यावेळी राहुल उगले म्हणाले, नगरपरिषद प्रशासन शहरातील सर्व व्यवहार सक्तीने बंद करत आहेत. दुकाने बंद न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे सांगत आहेत. त्यामुळे छोटे दुकानदार, फेरीवाले, फळ विक्रेते, हॉटेल व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.
याबाबत शासनाचा आदेश असेल, तर जाहीर करा, अन्यथा उपोषणाला बसू, असा इशारा त्यांनी दिला.
तहसीलदार विशाल नाईकवाडे म्हणाले, कोविड प्रादुर्भावाचा सरासरी वेग व संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करून, व्यापारी व प्रशासनाच्या समन्वयातून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचे पालन करणे पूर्णतः ऐच्छिक असल्याचे नाईकवाडे यांनी सर्व व्यापाऱ्यांना व काँग्रेस पदाधिकाऱ्यांना सांगितले.
यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष देविदास भांडलकर, अल्पसंख्यांक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष फिरोज पठाण, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष शिवराज घुमरे, शहराध्यक्ष विक्रांत अब्दुले, जिल्हा सचिव सुनील शिंदे, ओबीसी काँग्रेसचे शहराध्यक्ष अमोल खेत्रे, अनिकेत जाधव, व्यापारी प्रतिनिधी सागर आंदुरे, संकेत ढाळे, ऋषिकेश ओझर्डे, अंकुश मुसळे, अमोल गिरमे, फिरोज बागवान, कृष्णा कुमार अहुजा, रितेश गुलाटी, किशोर अंदुरे, काँग्रेसचे कार्यकर्ते व व्यापारी उपस्थित होते.