श्रीगोंदा : आवर्तन चालू असताना कुकडी कालव्यावरील शेतकऱ्यांचे कृषिपंपाचे पाईप, केबल तोडणे योग्य नाही. शेतकरी जलसंपदा विभागास मदत करतील. त्यामुळे यापुढे विनाकारण तोडफोड करून कृषिपंपांचे नुकसान करू नये, अशा सूचना प्रांताधिकारी स्वाती दाभाडे यांनी दिल्या आहेत.
घारगाव, भानगाव शिवारातील कुकडी कालव्यावर शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचे पाईप जलसंपदा विभागाच्या भरारी पथकाने फोडले. त्यावर बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी मंगळवारी (दि. १) कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांच्या कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. घारगाव येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारी तहसीलदार प्रदीप पवार यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीस तहसीलदार प्रदीप पवार, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, संभाजी ब्रिगेडचे टिळक भोस उपस्थित होते. बैठकीत समाधानकारक चर्चा झाल्याने एक जूनचे आंदोलन स्थगित केल्याचे बाळासाहेब नाहाटा यांनी सांगितले.
एक तर कुकडीचे आवर्तन उशिरा सोडले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सूचना न देता त्यांचे पाईप फोडले गेले. जलसंपदा विभागाने कारवाई करताना भान ठेवण्याची गरज आहे. यापुढे असा अन्याय केला, तर शेतकरी कुणालाच माफ करणार नाहीत, असा इशारा नाहाटा यांनी दिला.
जलसंपदा विभागाच्या वतीने उपअभियंता फडतरे म्हणाले, शेतकऱ्यांनी आणखी आठ दिवस सहकार्य करावे. श्रीगोंद्यात पाणी सुरू झाले की, कृषिपंप चालू करू. पहिले तीन दिवस कृषिपंप चालू ठेवून आम्ही शेतकऱ्यांना मदतच केली आहे.
यावेळी जालिंदर खामकर, विष्णू खामकर, विठ्ठल खामकर, बाळासाहेब खामकर उपस्थित होते.