लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : श्री क्षेत्र भगवानगड हे सर्व जाती-धर्माच्या भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे तेथील भक्तांच्या भावना लक्षात घेता गडावर किंवा गडाच्या जागेत कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या भाषणास किंवा राजकीय सभेस परवानगी देऊ नये, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे केली.भगवानगड हे आमचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी भाविकांना राजकीय भाषणांचा मेळावा नको आहे. मागील वर्षी याच कारणावरून हाणामा-या झालेल्या आहेत. त्याची पुनरावृत्ती आता नको. याशिवाय कोणालाही उपोषणास बसण्याची परवानगी देऊ नये. महंतांची व गडाची सुरक्षा आमच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही,याची काळजी प्रशासनाने घ्यावी व राजकीय सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी खरवंडी कासार, मालेवाडी, ढाकणवाडी, काटेवाडी, मिडसांगवी, भारजवाडी, कीर्तनवाडी, पिंपळगव्हाण आदी गावांतील ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.निवेदनावर बाबूराव विश्वनाथ ढाकणे, आश्रू किसन कराड, बाळासाहेब बटुळे, ज्ञानदेव हरी खेडकर, विठ्ठल ज्ञानदेव खेडकर, विकास कराड, भुजंग बटुळे, आसाराम ढाकणे, सुमन पाखरे, विश्वनाथ थोरे, आण्णा थोरे, अशोक थोरे आदींसह शेकडो ग्रामस्थांच्या सह्या आहेत.ऊसतोडणी युनियनचाही मेळाव्यास विरोधराज्य ऊसतोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियनचाही या राजकीय मेळाव्यास विरोध आहे. भगवानगड हे सर्व जाती-धर्माचे श्रद्धास्थान असून, तेथील शांतता अबाधित राखण्यासाठी कोणत्याही राजकीय सभेस किंवा भाषणास परवानगी देऊ नये, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.
भगवानगडावर राजकीय सभा नको : परिसरातील गावांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 9:25 PM