कोपरगाव : शासन गोरगरीब जनतेला रेशनकार्डवर गव्हाऐवजी मका देत आहे. त्यामुळे सरकार गोरगरीब जनतेला जनावरे समजत आहे का, असा संतप्त सवाल लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. नितीन पोळ यांनी म्हटले आहे.
पोळ म्हणाले, मागील काही महिने सर्व व्यवस्थित सुरू असताना, कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याने शासनाने पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय घेत असताना शासनाने गोरगरीब जनतेला सपशेल वाऱ्यावर सोडले आहे. गोरगरीब व हातावरचे पोट असलेल्या लोकांना कामधंदा नाही. लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडता येत नाही. त्यातच शासन रेशनकार्डवर गव्हाऐवजी मका देत आहे. मका हे भरड धान्य आहे. त्याचा वापर जनावरांना खाण्यासाठी केला जातो. माणसांनादेखील विविध प्रकारच्या खाण्याच्या पदार्थांत मका वापरला जात असला, तरी निव्वळ मका अद्याप तरी खाण्यात वापरला जात नाही. असे असताना शासन कोणत्या धोरणाने नागरिकांना रेशनकार्डवर मका देत आहे, हे समजायला मार्ग नाही. त्यामुळे गोरगरीब जनतेची उपासमार होत आहे. तसेच आंबेडकर जयंती व गुढीपाडवा असे दोन सण असून मकावाटपाचा निर्णय रद्द करून त्वरित गहूवाटप करावे.