अहमदनगर : सध्या कोरोना लसीकरणाबाबत अनेक तक्रारी येत असून, काही ठिकाणी गोंधळ होत आहे. त्यामुळे यात सुसूत्रता येण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक गावात समान लसीकरणाचे नियोजन करा. म्हणजे सर्व गावांना न्याय मिळेल. याशिवाय कोव्हॅक्सिन केवळ दुसऱ्या डोससाठी वापरून ते लसीकरण आधी संपवा. कोविशिल्डची ६० टक्के लस पहिल्या डोससाठी, तर ४० टक्के लस दुसऱ्या डोससाठी वापरा. यातून गोंधळ टळेल, अशा सूचना खासदार डाॅ. सुजय विखे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.
खा. सुजय विखे यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. त्यात पंतप्रधान आवास योजना, तसेच कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला. बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संदीप सांगळे, मनपाचे आरोग्य अधिकारी डाॅ. सतीश राजूरकर यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक, प्राथमिक रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.
प्रारंभी डाॅ. सांगळे यांनी आतापर्यंत जिल्ह्यात झालेल्या लसीकरणाचा आढावा घेतला. त्यानंतर विखे यांनी लसीकरणात येणाऱ्या अडचणींवर वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ग्रामीणसह शहरी भागात लसीकरणात राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना अडचणी येतात. तसेच अनेक गावांत अजून लस पोहोचलेली नाही. सध्या प्राथमिक उपकेंद्रांतर्गत असलेल्या गावांत उपलब्ध लसीप्रमाणे क्रमाने लसीकरण सुरू आहे. परंतु यातून अनेक जण वंचित राहत आहेत. त्यामुळे गावांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आलेली लस विभागून द्या. म्हणजे मोठ्या लोकसंख्येच्या गावात आवश्यक लस पोहोच होईल. तसेच लहान लोकसंख्येचेही गाव त्यात समाविष्ट होईल. याशिवाय आपल्याकडे ८० टक्के कोविशिल्ड, तर २० टक्के कोव्हॅक्सिन अशा प्रमाणात लस उपलब्ध होत आहे. सध्या २१ हजार नागरिकांचा कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस बाकी आहे. त्यामुळे हे लसीकरण आधी संपवण्यासाठी सध्या कोव्हॅक्सिनचा केवळ दुसराच डोस देण्यात यावा. पहिला कोणालाही देऊ नये. कोविशिल्डचे नियोजन करताना उपलब्ध लसीपैकी ६० टक्के लस पहिल्या डोससाठी, तर ४० टक्के लस दुसऱ्या डोससाठी वापरा, अशा सूचना विखे यांनी दिल्या.
-------------
शहरात वाॅर्डनिहाय नियोजन करा
ग्रामीण भागात लसीकरणाचे जसे गावनिहाय नियोजन आहे, तसेच नगरपालिका किंवा महापालिका क्षेत्रात एकाच केंद्रावर लस देण्यापेक्षा वाॅर्डनिहाय नियोजन केल्यास सर्वांपर्यंत लस पोहोचेल, असे विखे म्हणाले. याशिवाय नगरपालिकेच्या ठिकाणी असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयात केवळ नगरपालिका हद्दीतील लोकांना लस द्यावी. ग्रामीण भागातील लोकांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घ्यावी, असे विखे म्हणाले.
---------------
त्या डॉक्टरांवर कारवाई
जे वैद्यकीय अधिकारी किंवा इतर डाॅक्टर ड्युटीवर असताना मद्यपान केलेले आढळतील त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई केली जाईल. दोन-तीन तालुक्यांत असे कर्मचारी आढळले आहेत. येत्या पंधरा दिवसांत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे विखे यांनी सांगितले. दुसरीकडे लसीकरण करताना जर कोणी पुढारी किंवा इतरांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना त्रास दिला तर थेट मला कळवा, त्यांचा योग्य बंदोबस्त केला जाईल, असाही दम विखे यांनी भरला.
--------
राजकीय हस्तक्षेप डोकेदुखी
अनेक ठिकाणी लसीकरणात राजकीय हस्तक्षेप होत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी वाटलेले अर्ध्यापेक्षा जास्त टोकन आमदार किंवा सरपंचाच्या घरीच सापडतात. त्यामुळे पुढाऱ्यांनीही असे करू नये. आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करून लसीकरण मोहीम यशस्वी करा, असे आवाहन विखे यांनी केले.
--------