करंजी : कल्याण-निर्मळ महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे दररोज अपघात होत आहेत. रस्त्यावर टाकलेल्या मातीमुळे रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. आता सात दिवसांत काम करा, नाही तर चक्का जाम आंदोलन करू, असा इशारा शिवसेना व संतप्त नागरिकांनी दिला आहे.
कल्याण-निर्मळ महामार्ग क्र. ६१ या महामार्गाचे काम तब्बल ३ वर्षांपासून रखडले आहे. नगर-पाथर्डी या रस्त्यावरील करंजी ते कौडगाव (ता. नगर) या १२ कि.मी. अंतरात दररोज अपघात होऊन अनेकांचे बळी गेले, तर अनेकांना अपंगत्व आले. करंजी (ता. पाथर्डी) बसस्थानकापासून घाटापर्यंत रस्त्याची दुर्दशा झाली आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये माती आणून टाकल्याने धुळीचे लोट उडत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या लोकांना अस्थमा, ॲलर्जी, आदी आजाराने त्रस्त केले आहे. या महामार्गाच्या कामासाठी वर्षाला ठेकेदार बदलूनही काम झाले नाही.
सोमवारी (दि. २७) सकाळी ९ वाजता करंजी बसस्थानकावर रास्ता रोको करण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रफिक शेख, स्वप्निल मुखेकर, शिरीष मुखेकर, सुनील पवार, अनंत सुनील अकोलकर, आझाद पठाण, अल्ताफ पठाण, लाला रंगनाथ खोसे, अशोक अकोलकर, शफिक शेख, भारत मोरे, विजय शिंदे, नितीन गाडेकर, अशोक काळे, बाळासाहेब साखरे, आदींनी दिला आहे.
........
नगर-पाथर्डी या रस्त्याचे काम तीन वर्षांपासून रखडले आहे. या रस्त्यामुळे शेकडो प्रवाशांचे बळी गेले आहेत, तर अनेकांना अपंगत्व आहे आहे. आता सात दिवसांत काम करा, नाही तर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.
-रफिक शेख, जिल्हा उपप्रमुख, शिवसेना