----
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : शहराच्या चौपाटीवर, गजबजलेल्या ठिकाणी चायनीज खाद्यपदार्थ्यांचे स्टॉल थाटलेले दिसून येतात. ठसकेबाज फोडण्यांचा सुगंध दरवळल्यानंतर कधी कधी आपलीही पावले अशा स्टॉलकडे वळतात. जिभेचे चोचले पुरविण्यासाठी आपण बऱ्याचवेळा असे चायनीज पदार्थ खातो. मात्र, असे पदार्थ अतिखाणे धोकादायकच असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
जिभेचे चोचले पुरविण्यासाठी चायनीज पदार्थ खाणाऱ्यांची संख्या सध्या वाढली आहे. याकडे लहान मुले आणि तरुण जास्त आकर्षित होते. मात्र, असे पदार्थ खाणाऱ्या शौकीनांना थोडी सावधानता बाळगण्याची गरज आहे. आरोग्यासाठी हानिकारक असलेला ‘अजिनोमोटो’ हा टेस्टिंग पावडर म्हणून चायनीज पदार्थात वापरला जातो. मात्र, यामुळे पोट बिघडू शकते, असे तज्ज्ञ सांगत आहेत. हातगाडी आणि हॉटेलात चायनीज पदार्थ खाणाऱ्यांची मोठी गर्दी असते. अशी हातगाडी कुठेही असली तरी तिथे गर्दी ही ठरलेलीच असते. खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविणाऱ्या विशिष्ट चवीमुळे चायनीज पदार्थ खाल्ले जातात. या विशिष्ट चवीसाठीच अजिनोमोटो वापरले जाते; पण सातत्याने हे खाण्यात आले तर त्यापासून आजार बळवतात.
---
काय आहे अजिनोमोटो?
अजिनोमोटोला मोनो सोडियम ग्लुटामिट (एमएसजी) असे म्हणतात. ग्लुटामिट सीडचे ते सोडियम मीठ आहे. हे नैसर्गिकरीत्या पदार्थ वापरून निर्मित केलेले रासायनिक उत्पादन आहे. चायनीज पदार्थ किंवा हॉटेलमध्ये भाजीला चव येण्याकरिता याचा वापर होतो.
----------
खाणे टाळा
अजिनोमोटोचा चायनीज पदार्थामध्ये मिठासारखा वापर होतो. अजिनोमोटोचा वापर केलेले पदार्थ अतिप्रमाणात खाल्ल्याने पोटाचे विकार होतात, तसेच हृदयविकाराचा धोकाही वाढतो. पोटाचा कर्करोगसुद्धा होण्याची शक्यता असते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
------------
अजिनोमोटो असलेले अन्नपदार्थ वारंवार खात राहिल्याने त्याचे परिणाम शरीरावर दिसून येतात. आठवड्यातून एखाद्या वेळेस अजिनोमोटो असलेले चायनीज पदार्थ खाल्ले तर हरकत नाही. मात्र, सातत्याने अनेक वर्षे व सातत्याने असे पदार्थ खाल्ले तर पोटाचे विकार होऊ शकतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक घातक असतो, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
-पोटविकार तज्ज्ञ, अहमदनगर