अनिल साठे - शेवगाव (अहमदनगर) : देशी दारूचा काढा घेतल्याने कोरोनाचे रुग्ण बरे होतात या दाव्यापासून संबंधित डॉक्टरने तीनच दिवसात घूमजाव केले आहे. ‘कुणीही या पद्धतीने उपचार करू नये. त्यातून काही उद्भवल्यास आपण जबाबदार राहणार नाही’, असा पवित्रा प्रशासनाच्या नोटीसीनंतर आता या डॉक्टरने घेतला आहे.शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील डॉ. अरुण भिसे यांनी आपण देशी दारूची मात्रा देऊन कोरोना रुग्ण बरे केल्याचा दावा केला होता. पन्नासहून अधिक रुग्णांना आपण दररोज तीस मिलीलिटर देशी दारू दिली. ही ठराविक मात्रा दिल्यानंतर रुग्ण बरे झाल्याचे आढळले, असे कथन त्यांनी सोशल मीडियावर केले होते.‘लोकमत’ने प्रशासनाचे या दाव्याकडे लक्ष वेधल्यानंतर शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे यांनी डॉ. भिसे यांना खुलासा विचारला होता. तहसीलदार अर्चना पागिरे यांनीही त्यांना समक्ष उपस्थित राहून खुलासा करण्यास बोलविले होते. प्रशासनाकडून पत्रव्यवहार सुरू होताच भिसे यांनी आपला दावा मागे घेतला आहे. प्रशासनाकडून आलेल्या नोटीसला त्यांनी बुधवारी सायंकाळी उत्तर दिले आहे.व्हिडिओच पाहिला नाहीनगरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा म्हणाले, डॉ. भिसे यांनी काय दावा केला ते मला माहीत नाही. मी हा व्हिडिओच पाहिला नाही. काय दावा आहे तो व्हिडिओ मला पाठवा.
सर्वांना सांगू इच्छितो की, मी माझ्या पोस्टमध्ये...डॉक्टर म्हणाले मी सर्वांना सांगू इच्छितो की, मी माझ्या पोस्टमध्ये फक्त आणि फक्त देशी दारूने कोरोना बरा होतो असा कोणताही दावा केलेला नाही. मी रुग्णांना शासनमान्य ॲलोपॅथिक औषधे पण दिली होती. कोरोनावर दारूचा उपचार करण्यास शासनाने अगर तज्ज्ञांनी मान्यता दिलेली नाही. त्यामुळे कोणीही कोरोना रुग्णाला दारू देऊ नये. माझ्या पोस्टचा गैरअर्थ काढून कोणी अपप्रचार करून व्यसनाचे किंवा दारूचे समर्थन करू नये.